मुंबई : देशाच्या अनेक भागात मान्सून पोहोचला आहे. आणि मान्सूनसोबत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतही सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. सहा दशकानंतर प्रथमच मुंबई आणि दिल्लीत एकाचवेळी मान्सून पोहोचला आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुंबईत जोरदार पावसाने जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. पावसाने काही लोकांचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) रविवारी मुंबईसह महाराष्ट्रात तसेच किनारपट्टीवर पुढील ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ३१ मिमी पाऊस झाला. तर पूर्व उपनगरांमध्ये ५४ मिमी आणि पश्चिम उपनगरांमध्ये ५९ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळू शकतो असे सांगण्यात आले आहे.
हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्राच्या अनेक भागात पुढील दोन दिवसांसाठी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बंगालच्या खाडीमध्ये कमी दबावाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील ४८ तासात कोकणासह राज्यात जोरदार पाऊस कोसळेल. दीर्घ काळानंतर दक्षिण-पश्चिम मान्सून गतीने पुढे सरकत असल्याचे आयएमडीने सांगितले.