दक्षिण भारतात पावसाचा धुमाकूळ, आणखी ४ दिवस कोसळणार

नवी दिल्ली : जोरदार पावसाने दक्षिणेकडील राज्ये आंध्र प्रदेश, तामीळनाडू आणि कर्नाटकात भंयकर धुमाकूळ घातला आहे. गेल्या अनेक वर्षात असा मुसळधार पाऊस झालेला नाही. हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण मध्य बंगालच्या खाडीवर चक्रीय स्थितीचे क्षेत्र तयार झाले आहे. २६ ते २८ नोव्हेंबर या काळात तामीळनाडूचा उत्तर भाग, चेन्नई, कवाली, नेल्लोर, तिरुपतीसह आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, तामीळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मन्नार खाडीसह दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीत २६ ते २७ नोव्हेंबरपर्यंत जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रापासून लांब राहण्यास सांगण्यात आले आहे.

आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडूत गेल्या तीस वर्षातील उच्चांकी पाऊस झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घरांमध्ये पाणी घुसलेल्या ठिकाणी दहा हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. पूर्ण नुकसान झालेल्या घरांना ५ लाख रुपये दिले जातील. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाचे आयुक्त मनोज राजन यांनी सांगितले की, राज्यात नोव्हेंबर महिन्यात १२९ मिमी पाऊस झाला आहे. या महिन्यातील सरासरी पावसाच्या तुलनेत हा २७१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही राज्यातील परिस्थितीवर बारिक नजर ठेवली आहे. मदतकार्याला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here