अजिंक्यतारा कारखान्याचा नवा विक्रम

334

सातारा: कै. अभयसिंहराजे भोसले यांच्या अजिंक्‍यतारा साखर कारखान्याकडून गाळपास आलेल्या ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना लवकर दिले जात आहेत. पहिल्यापासूनच या कारखान्याने शेतकरी हीत जोपासण्याला प्राधान्य दिले असून, हा कारखाना म्हणजे सभासद शेतकऱ्यांच्या हक्काची संस्था असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. 35 वर्षांच्या इतिहासात यंदाच्या हंगामात कारखान्याने 12.85 टक्के साखर उताऱ्याने साखर उत्पादन करून साखर उताऱ्यात नवीन विक्रम प्राप्त केल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याचा 36 वा गळीत हंगाम आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अध्यक्ष सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्‍वास शेडगे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक संजीव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

गाळप हंगामाचा समारोप आम भोसले यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी भोसले यांच्या हस्ते शेवटच्या पाच पोत्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी आम. भोसले यांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या.

कोरोना पार्श्वभूमीवरील सध्याच्या गाळप हंगामात 155 दिवसात 6 लाख 12 हजार 917. 029 मे. टन ऊसाचे गाळप होऊन विक्रमी 12.85 टक्के साखर उताऱ्याने 7 लाख 70 हजार 450 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. या उत्पादनामधील एक लाख सातशे पन्नास क्विंटल साखर विदेशातही निर्यात करण्यात आली. तसेच 20 लाख लिटर्स इथेनॉलची निर्मिती करून भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइल या कंपन्यांना इथेनॉल ही पुरवण्यात आले आहे. या वर्षाच्या गाळप हंगामात सरासरी 158.39 टक्के क्षमतेचा वापर होऊन प्रतिदिन 3990.78 मे. टन सरासरीने ऊस गाळप करण्यात आले.

शासन निर्धारित सूत्रानुसार 2790 रुपये प्रतिटन एफआरपी निघाली असून गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल म्हणून 2500 रुपये प्रतिटनप्रमाणे बिल वेळेत देण्यात आले आहे. ऊसाचे 10 दिवसांप्रमाणे बिल दिले असून दर दहा दिवसांचे बिल देणारा अजिंक्‍यतारा हा राज्यातील एकमेव कारखाना ठरला आहे.

करोनाच्या संकटातही कारखाना व्यवस्थापनाने 31 मार्चपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाला 150 रुपये प्रतिटन याप्रमाणे दुसरा हप्ता देऊन आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. ऊस बिलाची उर्वरित रक्कमही शेतकऱ्यांना लवकरच भागवण्यात येईल, अशी ग्वाही शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here