औरंगाबाद : महाराष्ट्राने यंदा साखर उत्पादनात उत्तर प्रदेशला पिछाडीवर टाकले आहे. याशिवाय, आतापर्यंत उच्चांकी १३२ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्य सरकारने अतिरिक्त ऊस उत्पादनाशी संबंधीत मुद्दे आणि स्थितीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत राज्यात ११८७ लाख टन ऊस गाळप झाले आहे. तर अद्याप ९० लाख टन ऊस शेतात गाळपाविना उभा आहे. हा बहूसंख्य ऊस मराठवाडा विभागात आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत २०१९-२० या हंगामात उच्चांकी १०७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यावर्षी चांगला पाऊस आणि ऊस लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादन जवळपास १३२ लाख टनापर्यंत पोहोचले आहे. उत्तर प्रदेशात यंदा आतापर्यंत कमी साखर उत्पादन झाले आहे. राज्यातील विविध कंपन्यांनी या हंगामात इथेनॉल विक्री करून चांगला महसूल मिळवला आहे.
महाराष्ट्रात ऊस गाळपाचा हंगाम सरासरी १२० ते १४०दिवस आणि जास्तीत जास्त १४५ दिवस चालतो. ऊस उत्पादन वाढल्याने यंदा राज्यातील २० साखर कारखाने १६० दिवसांपर्यंत सुरू राहतील. मराठवाड्यात ३१ मे पर्यंत गाळप सुरू राहील. सोलापूरमधील काही कारखान्यांसाठी मराठवाड्यातून २०,००० टन ऊस गाळपास आणला जात आहे.