एमएसपी वाढल्याने निर्यातीवर परिणाम नको : नाईकनवरे

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा 

नवी दिल्ली : चीनी मंडी

साखर उद्योगातून साखरेची देशांतर्गत बाजारातील किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढवण्याची सातत्याने मागणी होती. त्याला अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला असून, २९०० वरून ३१०० रुपये प्रति क्विंटल असा साखरेचा किमान विक्री दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे साखर उद्योगापुढे आशेचा किरण निर्माण झाला आहे. पण, साखरेची एमएसपी वाढवल्यामुळे त्याचा निर्यातीवर परिणाम होऊ नये, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

या संदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, ‘प्रति किलो दोन रुपये किमान विक्री किंमत वाढवल्यामुळे साखर कारखान्यांना क्विंटलमागे २०० रुपये जादा मिळणार आहेत. यामुळे कारखान्यांकडे कॅश उपलब्ध होऊ लागेल. त्यामुळे ऊस उत्पादकांची देणी भागवण्याला थोडीफार मदत होईल. पण, यामुळे साखरेची निर्यात कमी होता कामा नये. देशात साखरेचा साठा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो कमी झालाच पाहिजे. साखर कारखान्यांनी वाढीव एमएसपी शेतकऱ्यांची देणी भागवण्यासाठी लावावीआणि निर्यातीवर लक्ष केंद्रीत करावे.

आता सरकारने एमएसपी वाढवली आहे. त्यामुळे साखरेच्या किमतीमधील समानतेला धक्का बसणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाची साखर येण्यापूर्वी मार्च आणि एप्रिलच्या आधीच साखर निर्यातीचे करार करून घेण्याची संधी आहे. अगदी नुकसान होत असले तरी कारखान्यांना निर्यात करण्याची संधी आहे. या संधीचा कारखान्यांनी फायदा उठवला पाहिजे, असे मत नाईकनवरे यांनी व्यक्त केले आहे.

अतिरिक्त पुरवठा साखर उद्योगासाठी डोकेदुखी ठरत आहे. एकिकडे साखरेचे दर सातत्याने घसरत आहेत, तर दुसरीकडे साखरेला उठावही कमी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ऊस थकबाकीच्या ओझ्याखाली साखर कारखाने दबले जात आहेत. सरकारने महिन्याचा साखर विक्री कोटा जाहीर करण्याची पद्धत सुरू केल्याने साखरेचा साठा हळू हळू पुढे सरकू लागला आहे. पण, दुसरीकडे साखर कारखान्यांना निर्यातीसाठी झगडावे लागत आहे. ऊस उत्पादकांची वाढती थकबाकी हा साखर उद्योगापुढील चिंतेचा विषय होता. मात्र, एमएसपी वाढवण्यात आल्याने थकबाकीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागेल, अशी आशा आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp 

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here