ऊना : देशातील अनेक राज्यांमध्ये इथेनॉल प्रोजेक्ट्सची घोषणा केली जात आहे. यामध्ये अनेक राज्ये हिरीरीने भाग घेत आहेत. हिमाचल प्रदेशातही इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे.
ट्रिब्यून इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृषी तथा ग्रामीण विकास मंत्री विरेंद्र कंवर यांनी जिल्हास्तरीय हिमाचल दिवस समारंभात सांगितले की, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) जिल्ह्यासाठी कृषी आधारित इथेनॉल प्लांटला मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. मंत्री विरेंद्र कंवर यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेश गेल्या ७५ वर्षापासून अस्तित्वात आहे. सर्व मुख्यमंत्र्यांच्या सक्षम नेतृ्त्वाने लोकांची इमानदारी, समर्पण आणि कठोर मेहनतीने हिमाचल प्रदेशला देशात एक आदर्श राज्य बनवले आहे.
ते म्हणाले, गेल्या साडेचार वर्षात राज्य सरकारने समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी काम केले आहे. वृद्धावस्था पेन्शनची वयोमर्यादा घटवून ८० वर्षावरून ६० वर्षे करण्यात आली आहे. दैनिक वेतन ३५० रुपये करण्यात आले आहे. हिमकेअर योजना सुरू करण्यात आली असून कुटुंबातील प्रत्येक सदस्य यासाठी ५ लाख रुपयांच्या आरोग्य विम्यास पात्र आहे. जीवघेण्या आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना या मदत योजनेच्या कक्षेत आणण्यात आले आहे.