अमेरिकन रिसर्च फर्म हिडनबर्गच्या अहवालाचा परिणाम आताही अदानी ग्रुपवर दिसून येत आहे. गेल्या २० दिवसांपासून मोठे नुकसान सोसत असलेल्या ग्रुपने शॉर्ट सेलर फर्मविरोधात कायदेशीर आर-पार लढाई लढण्याची तयारी केली आहे. याशिवाय डॅमेज कंट्रोल करण्याकडे आपला फोकस वळवला आहे. कर्जाची परतफेड करण्यापासून ते रोकड वाचविण्यापर्यंत विविध उपायांवर भर दिला जात आहे. शेअर बाजारात आलेल्या त्सुनामीमुळे झालेल्या नुकसानीनंतर अदानी ग्रुपने आता रेव्हेन्यू ग्रोथ टार्गेट ४० टक्क्यांनी घटवले आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात २४ जानेवारी रोजी अमेरिकन फर्म हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल जाहीर झाला आणि तेव्हापासून अदानी ग्रुपला तोटा सहन करावा लागत आहे. ८८ गंभीर प्रश्न उपस्थित करणारा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समुहाचे मार्केट कॅपिटल ११७ अब्ज डॉलरने घसरले आहे. शेअर्समधील घसरणीमुळे गौतम अदानी यांचे नेटवर्थ कमी झाले असून जगातील अब्जाधिशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावरून ते टॉप २० लिस्टबाहेर गेले आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्ट नुसार, अदानी ग्रुप पुढील आर्थिक वर्षासाठी रेव्हेन्यू ग्रोथ टार्गेट ४० टक्के घटवून १५ ते २० टक्के करू शकतो. अदानी ग्रुपने आपले गहाण असलेले शेअर्स सोडविण्याची तयारी केली आहे. अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जीचा यात समावेश आहे. आज, सोमवारीही अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सकाळी साडेनऊ वाजता अदानी पॉवरचा शेअर ४.९९ टक्क्यांनी घसरून १५६ रुपयांवर आला. तर अदानी विल्मर लि, चा शेअर १.४८ टक्के घसरून ४२९.४५ वर ट्रेड करीत होता. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड, अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. Adani Enterprises चा शेअर किरकोळ घसरणीनंतर १८४५.७५ रुपयांवर ट्रेड करीत होता.