एशियन गेम्समध्ये भारतीय महिला संघाचा इतिहास, क्रिकेटमध्ये जिंकले पहिले सुवर्णपदक

हांगजोऊ: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडविला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १९ धावांनी थरारक विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघात झालेला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत थरारक झाला. श्रीलंकेला शेवटच्या ५ षटकात ४३ धावांची आवश्यकता होती. पण भारतीय संघाच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत श्रीलंकेला वरचढ होऊ दिले नाही.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने ७ बाद ११७ धावा केल्या. भारताकडून स्मृती मानधना आणि शफाली वर्मा प्रथम सलामीसाठी आले. शफाली वर्मा अवघ्या ९ धावा करून बाद झाली, पण स्मृती आणि जेमिमाहने भारताचा डाव सावरला. स्मृती मानधनाने ४५ चेंडूत ४६ धावा केल्या तर जेमिमाहने ४० चेंडूत ४२ धावा केल्या. त्यानंतर रिचा घोषने शानदार षटकार मारत ९ धावांची भर घातली. श्रीलंकेकडून प्रबोधिनी, सुगंधिका कुमारी आणि रणवीरा यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतले.

श्रीलंकेची दुसऱ्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यांनी दुसऱ्याच षटकात झटपट २ विकेट्स गमावले. तर चौथ्या षटकात चमारी अथापथुच्या रूपात महत्त्वाची विकेट मिळाली. या तिन्ही विकेट गेल्या सामन्यात पदार्पण केलेल्या तितास साधूने मिळवल्या आहेत. तर पूजा वस्त्राकार, दीप्ती शर्मा, देविका वैद्य यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाड हीने आपल्या अनुभवाच्या` आधारावर २ विकेटस मिळवल्या. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेट स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले तर श्रीलंकेने रौप्य पदक जिंकले. बांगलादेशने पाकिस्तानला हरवून कांस्यपदक जिंकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here