कर्जतमधील शेकडो शेतकऱ्यांचा ऊस शेतातच, स्थिती बिकट

अहमदनगर : कर्जत तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंबालिका साखर कारखाना आहे. तर श्रीगोंदा तालुक्यात हिरडगाव, जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील श्रीराम हा कारखाना आ. रोहित पवार यांनी घेतला असल्याचे बोलले जाते, तर बारामती अॅग्रो कारखान्यालाही काही प्रमाणात तालुक्यातून ऊस जातो. तालुक्याच्या चारही बाजूने कारखाने असतानाही येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या ऊस तोडणीसाठी येणारे टोळीवाले एकरी पाच ते सहा हजार रुपये मागत आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय साठमारीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षा अनेक शेतकरी करत आहेत.

यावर्षी टोळ्या कमी असल्याने त्या मिळवण्यासाठी शेतकऱ्यामध्ये ही चढाओढ लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तिन्ही ठिकाणी तर काहींनी इतर ही ठिकाणी ऊस नोंदणी केलेली असताना अद्याप अनेकांचा नंबरच लागला नाही. ऊस बारा महिने होऊन गेलेले असताना अद्याप जात नसल्याने शेतकरी चिंताक्रांत आहेत. ऊस जाण्याअगोदरच अडचणीचा पाढा सुरू असल्याने ऊस गेल्या नंतर शेतकऱ्यापुढे अजून काय वाढून ठेवले आहे, याबाबत शेतकरी काळजीत आहेत. टोळ्या मिळत नाही म्हणून हार्वेस्टरला विचारणा केली त्यांनी ही दोन हजार रुपये एकरी मागितले गेले आहेत. ते देण्याची तयारी केली, पण अद्याप हार्वेस्टर चालकही फिरकले नाहीत अशी स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here