तोक्ते चक्रीवादळाने गुजरातसह पाच राज्यांचे १५ हजार कोटींचे नुकसान

नवी दिल्ली : तोक्ते चक्रीवादळाने गुजरात आणि किनारपट्टीवरील भागात प्रचंड नुकसान केले आहे. या वादळाने शेती क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. गुजरात आणि किनारपट्टीचे सुमारे १५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सौराष्ट्रामध्ये वादळामुळे हजारो एकरातील पिके खराब झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यातील नुकसानीची हवाई पाहणी केली. वादळात मृत्यूमुखी पडलेल्यांना २ लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना ५०,००० रुपयंची मदत करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

तोक्ते वादळाने २ लाख झाडे कोसळली असून सुमारे १७ हजार घरांचे नुकसान झाले आहे. राज्याच्या किनारपट्टीवरील भागात वादळाने प्रचंड नासधूस झाली असून ६९ हजारहून अधिक विजेचे खांब उखडले आहेत. त्यामुळे ३८५० हून अधिक गावांतील विज खंडीत झाली आहे. यामध्ये शेकडो जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

वादळामुळे गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये आंबा पिकाचे ७५ टक्के नुकसान झाले आहे. तर बाजरी, मुग, भुईमुग, चिकू, पपई आदींची ५० ते १०० टक्के नुकसान झाले आहे. आरएमएसआयने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात, दमण आणि दिव यांशिवाय इतर राज्यांपैकी केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. तोक्ते वादळाने एकूण १५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गुजरात आणि दमण-दीवचे निम्मे म्हणजे ७५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उर्वरीत राज्यांचे ७५०० कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. वादळाता शेती क्षेत्रावर १५ ते २० टक्के परिणाम झाला आहे. याशिवाय दळणवळण, बंदरे, वीज आणि टेलिकॉम क्षेत्रालाही फटका सोसावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here