उसाला ३५०० रुपये पहिली उचल दिल्यास मी लोकसभा लढविणार नाही : राजू शेट्टी यांची घोषणा

कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला ४०० रुपये दुसरा हप्ता आणि यंदाच्या गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रुपये दिल्यास मी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. जयसिंगपूर येथील ठिय्या आंदोलनस्थळी त्यांनी आ. प्रकाश आवाडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. केंद्रीय सहकारमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी आमदार प्रकाश आवाडे यांची सलगी आहे. त्यांनी यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

आ. प्रकाश आवाडे यांनी राजू शेट्टी हे लोकसभा निवडणुकीसाठी आंदोलनचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला शेट्टी यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, हे मलाही माहीत आहे. मात्र, आमदार आवाडे त्याचा बागुलबुवा करीत आहेत. धरणांतील पाणीसाठा पाहता जर काटकसरीने पाणी सोडण्याचे नियोजन केले, तर मे अखेरपर्यंत पुरवठा होऊ शकतो.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, राज्यकर्ते शेतकऱ्यांवर सुड उगवत आहेत. शेतकऱ्यांचा काटा काढायचा या सूडापोटी धरणात पाणीसाठा असतानाही धरणातून पाणी न सोडणे, कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करणे यासारखे प्रकार करू लागले आहेत. मी चळवळीसाठी जगणारा व राजकारण करणारा माणूस आहे. मला राज्यातील शेतकरी सुखी झालेले पाहायचे आहे. तुमचे तुम्हाला तुमची दुकानदारी चालवायची आहे, असा टोला शेट्टी यांनी आवाडेंना लगावला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here