भाजपची सत्ता आल्यास साखर १३ रुपये किलो; स्मृती इराणींचे आश्वासन

1441

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

अमेठी : चीनीमंडी

देशात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास नागरिकांना १३ रुपये किलो दराने साखर मिळेल, असे आश्वासन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी येथे दिले. स्मृती इराणी अमेठीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात रिंगणात आहेत. पंतप्रधान मोदींच्या वतीने आश्वासन देत असल्याचे सांगून सर्वसामान्यांना १३ रुपये किलो दराने साखर देण्याची ग्वाही दिली.

सध्या उत्तर प्रदेशातील अमेठीच्या हायप्रोफाइल लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पारंपरिक लोकसभा मतदार संघात स्मृती इराणी दुसऱ्यांदा आव्हान देत आहे. गेल्या निवडणुकीतही त्या राहुल गांधीच्या विरोधात रिंगणात होत्या. त्यावेळी त्यांनी राहुल गांधीच्या पारंपरिक मतदारसंघात त्यांचे लीड कमी करण्याची कामगिरी केली. यंदाही त्याच हेतूने स्मृती इराणी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे.

अमेठी मतदारसंघातील धराई गावात त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राहुल हे ‘बेपत्ता खासदार’ असल्याचा टोला त्यांनी लगावला. त्या म्हणाल्या, ‘अमेठीचे खासदार राहुल गांधी अमेठीला पाच वर्षांतून एकदा येतात. केवळ निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी ते येथे येतात. जर, निवडणुकीत अर्ज भरण्याची प्रक्रिया सक्तीची नसती तर, त्यासाठीही ते अमेठीला आले नसते.’

साखरे संदर्भात आश्वासन देताना स्मृती इराणी म्हणाल्या, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक संदेश घेऊन तुमच्यासाठी आली आहे. भाजपला ताकद द्या, असे आवाहन त्यांनी तुम्हा सगळ्यांना केले आहे. जर, भाजपची पुन्हा केंद्रात सत्ता आली तर, सामान्यांना १३ रुपये किलो दराने साखर मिळेल. राहुल गांधी पंतप्रधान मोदींना चोर म्हणतात. पण, राहुल यांचा मतदारसंघ म्हणून पंतप्रधान मोदींनी कधीही अमेठीशी दुजाभाव केला नाही, असेही स्मृती इराणी म्हणाल्या. जेव्हा पहिल्यांदा मी येथे आले तेव्हा, भाजपचा मतदारसंघात एकही आमदार नव्हता आता चार आहेत. पण सर्वांगिण विकासासाठी तुम्हाला खासदारही भाजपचाच निवडून द्यावा लागेल, असे सांगून त्यांनी मतदारांना भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले.

१३ रुपये किलो साखर देणार कशी?

केंद्रीय मंत्र्यांनी १३ रुपये किलो दराने साखर देण्याचे आश्वासन दिले असले तरी, ते प्रत्यक्षात कसे उतरणार याबाबत प्रश्न चिन्ह आहे. साखर कारखान्यांना सध्या साखरेचा किमान विक्री दर ३१ रुपये किलो आहे. देशात साखरेला मागणी घटली आहे. निर्यातीलाही अपेक्षित गती नाही. त्यामुळे अतिरिक्त साठा वाढला आहे. साखर उद्योग संकटात आहे. त्या परिस्थिती १३ रुपये किलो दराने कशी साखर देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here