“मोदी सरकारची सत्ता न आल्यास ऊस उत्पादक शेतकर्यांना गळफास घ्यावा लागेल”

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

सोलापूर / चीनी मंडी

वर्षानुवर्षे शेतकऱ्यांची फसवणूक, पिळवणूक करणारे आता सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या नावावर गळा काढत आहेत. त्यांच्या प्रश्नांचे भांडवल करून पुन्हा सत्तेत येऊ पाहत आहेत’अशी टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. भंडारकवठे येथील या कार्यक्रमानंतर प्रचारसभेत सहकारमंत्री देशमुख यांनी ‘पण, केंद्रातील मोदी सरकार जर सत्तेतून गेले तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होतील’ अशी भीतीही व्यक्त केली.

मंत्री देशमुख म्हणाले, ‘केंद्र सरकारने साखरेला किमान आधारभूत किंमत जाहीर केली. त्यामुळेच साखर कारखानदारीमधील अस्वस्थता संपली आहे. अडचणींवर तोडगा निघाला आहे. यापूर्वीही तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम  नाईक यांनी पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याचे धोरण स्वीकारले होते. नंतर काँग्रेसच्या काळामध्ये ते धोरण गुंडाळण्यात आले. त्यामुळेच ऊस उत्पादकांची अवस्था दयनीय झाली आहे. भविष्यात इथेनॉल निर्मितीवर भर दिला जाईल. केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. हे सरकार जर सत्तेतून पायउतार झाले तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे हाल होतील. त्यांना गळफास लावून घ्यावा लागेल.’

‘दोन्ही काँग्रेसला आता शेतकरी फसणार नाहीत,’ असे सांगून सहकारमंत्री देशमुख म्हणाले, ‘पूर्वीच्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा गुंडाळून ठेवला होता. मुळात शेतीमालाला हभीभाव देण्याचा कायदा १९६३ साली लागू झाला होता. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आजवर बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारण केले. संचालकांशी व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच राहिली. त्यातून कायदा गुंडाळून ठेवला गेला. आजवर हमीभावापेक्षा कमी भाव देणाऱ्या किती व्यापाऱ्याचे परवाने रद्द केले? याचे उत्तर त्यांनी द्यावे. आम्ही यापुढील काळात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यास अशा व्यापाऱ्यांचे परवाने तातडीने रद्द केले जातील. यासंबंधीचे अधिकार आता सरकारकडे घेण्यात येणार आहेत.’

‘काँग्रेसने आमच्या पालकमंत्र्यांना फसविले, त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला’ अशी टीका करून मंत्री देशमुख यांनी ‘बाजार समितीच्या निवडणुकीत मला हिसका दाखविल्याचा उल्लेख काँग्रेसवाले अलीकडे करीत आहेत. पण आणखी खूप काही आमच्या हाती आहे. त्यांनी समितीच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे प्रस्ताव द्यावेत’असे सांगितले.

यावेळी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मानव कल्याणासाठी उमेदवारी दाखल केली आहे असे सांगितले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, मंद्रुपच्या सरपंच कलावती खंदारे यांनी मनोगत व्यक्त केले. शांतवीर महास्वामी, सभापती सोनाली कडते, उपसभापती संदीप टेळे,  मनीष देशमुख , प्रभावती पाटील आदी उपस्थित होते.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here