रीगा साखर कारखाना १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू न केल्यास उपोषण: पप्पू यादव

87

सीतामढी : रीगा साखर कारखाना सुरू करण्यास होणारा उशीर आणि कृषी कायदे रद्द करण्याची मागणी याबाबत ठाम भूमिका घेत जन अधिकार पार्टीचे (जाप) राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी सीतामढीचा दौरा केला. रीगा फुटबॉल मैदानावर आयोजित मेळाव्यात शेतकरी, मजुरांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. पंधरा फेब्रुवारीपर्यंत रीगा साखर कारखाना सुरू न केल्यास बेमुदत उपोषण करू असा इशारा यादव यांनी दिला.

शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे, असे सांगून पप्पू यादव म्हणाले, रीगा परिसराचे औद्योगिक विकासात मोठे योगदान आहे. मात्र, सध्याच्या सरकारने याची दूरावस्था केली आहे. साखर कारखान्याच्या मालकांनी शेतकऱ्यांना बँकांचे कर्जदार बनण्यास भाग पाडले. स्वतः जामीनदार बनून शेतकऱ्यांना ऊस बिले बँकांच्या माध्यमातून दिली. मात्र, आता शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा येत आहेत हे गैर आहे.

यादव यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सरकारने कृषी विधेयक मागे घेतले पाहिजे. बंद साखर कारखाना सुरू करण्यास विलंब होत आहे. जर कारखाना लवकर सुरू केला नाही, तर बेमुदत उपोषण केले जाईल. कारखाना सुरू करण्यासाठी संघर्ष समिती स्थापन करू. राज्य सरकार फक्त नव्या उद्योगांची घोषणा करते. पण आज बिहारमध्ये २९ पैकी फक्त १० साखर कारखाने सुरू आहेत अशी दूरवस्था झाली आहे. सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत मालकांना कारखाना सुरू करायला लावावा. शेतकऱ्यांचे कर्ज मालकांच्या खात्यात जमा करावे. शेतकऱ्यांची ऊस बिलाची थकबाकी त्वरीत द्यावी. दोषी मालकांवर त्वरीत कायदेशीर कारवाई सरकारने केली पाहिजे. अन्यथा १५ फेब्रुवारीनंतर शेतकऱ्यांसमवेत बेमुदत उपोषण केले जाईल.

यावेळी प्रदेश अध्यक्ष राघवेंद्र सिंह कुशवाहा, जन अधिकार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सैयद एहतेशामुल हक, परिहारचे सरिता यादव, प्रदेश महासचिव महेंद्र सिंह यादव, अतुल बिहारी मिश्र, साखर कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष रामबाबू राय आदींची भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here