वाहतुकदारांचे प्रश्‍न न सोडवल्यास सोमवारपासून आंदोलन: सुरेश धस

ऊस वाहतुकदार आणि ऊस तोडणी कामगार यांच्या समस्या मोठ्या बिकट बनत चालल्या आहेत. असंख्य प्रश्‍न त्यांच्यासमोर उभे आहेत. हे प्रश्‍न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्‍नांना शासन दरबारी न्याय मिळाला नाही तर, सोमवार (दि.5) पासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा सज्जड इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला.

ऊस तोडणी मजूर आणि वाहतुकदार यांच्या प्रश्‍नासाठी कोल्हापूरात जिल्हा वाहतुक चालक मालक संघटनेच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार धस यानीं आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साखर कारखान्यांनी ऊस तोडणी मजुरांचे आर्थिक शोषण चालवले आहे. आता हार्वेस्टर मशिन आल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने कामगारांसाठी कायदे केले, पण ऊसतोड मजुरांचा त्यात उल्लेख नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी कायदा असणे आवश्यक आहे.

धस पुढे म्हणाले, ऊस तोड मजुरांना सुरक्षा मिळावी यासाठी गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार संघटना बांधून शासनाला कायदा करण्यास भाग पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. संघटनेने शासनाकडे या मागण्या मांडल्या आहेत. त्या मागण्या मान्य करुन मजुरांचे प्रश्‍न सोडवले नाहीत, तर सोमवारपासून तिव्र असे आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

या चर्चासत्रावेळी गोकुळचे संचालक बाबा देसाई, भाजपचे भगवान काटे, वाहतूकदार संघटनेचे धनाजी पाटील, श्रीकांत गावडे, बाबासाहेब पाटील, गोपीनाथ मुंडे संघटनेचे तात्यासाहेब हुले, दत्तोबा भांगे, बळीराम पोटे, बीड जिल्हा परिषदेचे हरिबापा घुमरे, नगरसेवक अमोल दीक्षित, दत्ता हुले, विष्णू भाकरे आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here