मुंबई (महाराष्ट्र) : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.
आयएमडीच्या सूचनेनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र किनाऱ्यावर ३ ते ५ ऑक्टोबर यांदरम्यान ४५-५५ किमी प्रतितास आणि ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या तीव्रतेनुसार वाऱ्याचा वेग वाढू शकतो. समुद्रातील परिस्थिती खूप खवळलेली आहे. उत्तर महाराष्ट्रातील किनाऱ्यांवर ५ ऑक्टोबरपर्यंत समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात, विशेषतः पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच वातावरणात ओलावा, ढगांची निर्मिती यामुळे उत्तर कोकणातील सखल भागात पूर येण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने ‘शक्ती’ चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर खबरदारी म्हणून सूचना जारी केल्या आहेत. जिल्हा प्रशासनांनी त्यांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय कराव्यात, किनारी आणि सखल भागातील नागरिकांसाठी स्थलांतर योजना तयार कराव्यात, सार्वजनिक सूचना द्याव्यात, समुद्र प्रवासाविरुद्ध सल्ला द्यावा आणि मुसळधार पावसात सुरक्षितता राखावी, असे सांगण्यात आले आहे.
(एएनआयच्या संदर्भासह)