अनलॉक प्रक्रियेनंतर लगेच गावांकडून कामगार परतले कामावर

75

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आपापल्या गावांकडे गेलेले प्रवासी मजूर देशाच्या विविध भागात अनलॉकची प्रक्रिया सुरू होत असल्याने आपापल्या कामाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. मोहम्मद सलमान आणि नसीम हे उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. लॉकडाउनपूर्वी ते महाराष्ट्रात नागपूरमध्ये काम करत होते. आता ते आपल्या कामावर परत येत आहेत.

नसीम यांनी सांगितले की, त्यांच्याकडील सर्व पैसे खर्च झाले आहेत. कामावर परतण्याशिवाय त्यांच्याकडे इतर कोणताच पर्याय नाही. तर सलमानला अद्याप कोरोनाची भीती सतावत आहे. कोरोनाचा फैलाव कमी झाल्यामुळे कामावर परतत असल्याचे सलमानने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

दिल्ली सरकारने लॉकडाऊन ७ जूनपर्यंत वाढवला आहे. या कामगारांना विचारले गेले की उत्तर प्रदेशातून ते दिल्लीत कसे प्रवास करतील आणि नागपूरला कसे जाऊ शकतात. याबाबत सलमानने सांगितले की, अमरोहापासून कौशंबी बस डेपोत बसने ते पोहोचले. इथे आल्यावर मी प्राथमिक आरोग्य केंद्रात माझी तपासणी करून घेतली. आता आम्ही दिल्ली रेल्वे स्टेशनवरुन नागपूरला जाणार आहोत. माझ्याकडे रेल्वेचे तिकीट आहे. मी कोरोनाच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करीत आहे.

कोशाम्बी बस डेपोचे प्रभारी अधिकारी कपिल कुमार यांनी एएनआयला सांगितले की, बस स्टँडवर आम्ही प्रवाशांची तपासणी करतो. ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळतात, त्यांच्यावर उपचार केले जातात अथवा जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. प्रवाशांना सातत्याने तपासणीचे आवाहन केले आहे. बसचे कंडक्टर शिवशंकर सिंह म्हणाले, बसमध्ये आलेल्या प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर दिले जाते. इथे तेवढीच सोय आहे. थर्मल स्कॅनिंग उपलब्ध नाही. तरीही अनेक लोक मास्क लावल्याशिवाय फिरताना दिसतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here