‘कोयता बंद’ आंदोलनाचा सोमेश्वर कारखान्याच्या गाळपावर परिणाम

पुणे : ऊसतोडणी व ऊस वाहतुकीत वाढ करावी या मागणीसाठी ऊसतोडणी व वाहतूकदार यांनी २५ डिसेंबर पासून ‘कोयता बंद’ आंदोलन पुकारले आहे. याचा परिणाम सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गाळपावर झाला. जवळपास निम्मी वाहने गटात उभी असल्याचे चित्र सोमेश्वर कारखाना परिसरात सोमवारी पाहायला मिळाले. हार्वेस्टर आणि ट्रक या वाहनातूनच फक्त ऊस गाळपासाठी आला. बैलगाडी आणि डम्पिंगची ऊस तोडणी बंद होती.

ऊसतोडणी वाहतूकदार – मुकादम यांचा ऊसतोडणी भाव वाढीसाठी संप सुरू आहे. ऊसतोडणी संघटना व साखर संघ यांच्यात दर तीन वर्षांनी ऊसतोडणी व वाहतुकीचे दर ठरवले जातात. २०२० ते २०२३ या कराराची मुदत संपली आहे. नवीन करार करण्यासाठी साखर संघासोबत आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या. पहिल्या बैठकीत ७, दुसऱ्या बैठकीत २४, तिसऱ्या बैठकीत २७ टक्के भाववाढीचा प्रस्ताव साखर संघाने ठेवला आहे. मात्र, ऊसतोडणी, वाहतूकदार, मुकादम यांना ५० टक्के भाववाढ हवी आहे. त्यामुळे बैठका निष्फळ ठरल्या.

राज्यातील ५० टक्के कारखाने २४ तासांपैकी ८-१० तास उसाअभावी बंद ठेवावे लागत आहेत, त्यामुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी ऊस वाहतूकदार संघटनेने केली आहे. आंदोलन मिटवण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. लवकरच आंदोलनावर तोडगा निघेल, अशी शक्यता व्यक्त केली जात हाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here