प्रदूषण रोखण्यासाठी पर्यायी इंधनावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज: नितीन गडकरी

नवी दिल्ली : पेट्रोलियम उत्पादनांची आयात वाढून १६ लाख कोटी रुपये झाली आहे. आणि ही आयात कमी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांची विक्री कमी करण्याची गरज आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या ६२ व्या वार्षिक संमेलनात बोलताना मंत्री गडकरी म्हणाले की, प्रदूषण रोखण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांची विक्री कमी करण्यासाठी पर्यायी इंधनावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

मंत्री गडकरी यांनी SIAMला आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची पद्धती शोधण्यास सांगितले. ते म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उद्योग विकसित करणे आणि दुचाकी, तिनचाकी तसेच चारचाकी वाहनांसोबत बसचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. ते म्हणले की, एक इलेक्ट्रिक हायवे लाँच करणे हे माझे स्वप्न आहे. नवे विचार घेवून तुम्ही माझ्याकडे या. माझ्याकडे पैसे, इतर साधने भरपूर आहेत. गडकरी यांनी असेही सांगितले की, भारताने रोप वे, केबल कार, हायपरलूप यांसारख्या तंत्रज्ञानावर लक्ष दिले पाहिजे. कंपन्यांनी आपल्या इंधनाला हरित हायड्रोजनमध्ये बदलण्याचाही त्यांनी आग्रह केला.

इथेनॉलबाबत बोलताना ते म्हणाले की, जादा प्रमाणात उत्पादित साखरेचा उपयोग इथेनॉल उत्पादनासाठी केला जावू शकतो. वाहन उद्योगाने फ्लेक्स इंजिन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे, जेथे १०० टक्के इथेनॉलचा वापर केला जावू शकतो. त्यातून पर्यावरणासह शेतकऱ्यांनाही मदत होईल. आगामी काही महिन्यांत देशात इथेनॉलचे पंप सुरू होतील असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here