महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी; गुप्त मतदान नको; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली:  महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश कोर्टाने दिला. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचे लाइव्ह प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकणार्‍या फडणवीस सरकारवरील विश्‍वासमताची तारीख लवकरात लवकर निश्‍चित करण्यात यावी, अशी मागणी या तिन्ही पक्षांनी केली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला. लोकशाही मूल्यांचे रक्षण झाले पाहिजे. लोकांना चांगले सरकार मिळवण्याचा अधिकार आहे, असे मत न्यायमूर्ती रमन्ना यांनी मांडून महाराष्ट्रात उद्या, बुधवारीच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा आदेश दिला. बहुमत चाचणीच्या पूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, तसेच मतदान हे गुप्त पद्धतीने नको, असेही न्यायालयाने सांगितले.

उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्यात यावी आणि हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आम्ही तिन्ही पक्ष समाधानी आहोत. बहुमत चाचणीआधीच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here