देशाच्या अक्षय्य ऊर्जा अभियानात साखर उद्योगाचा ठसा : खासदार शरद पवार

पुणे : भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा साखर उद्योग मजबूत कणा आहे. इथेनॉल, बायो-सीएनजी व हायड्रोजन हे भारताच्या अक्षय्य कार्यक्रमातील नवीन क्षितिज असून, त्यांचा वापर करण्याची क्षमता साखर उद्योगात आहे. देशाच्या अक्षय्य ऊर्जा अभियानात साखर उद्योगाने ठसा उमटवला आहे, असे प्रतिपादन को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.

को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित ‘साखर कारखाना संकुलांच्या हरित आणि अक्षय्य ऊर्जेसाठी एकात्मिक धोरण’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय को जनरेशन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पवार म्हणाले, एकात्मिक बायोमास एनर्जी प्रोग्रॅमचा समावेश असलेल्या साखर कारखान्यांवर आधारित बगॅस सहनिर्मितीचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा विज उत्पादक देश आहे.

यावेळी को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते पार पडले. सहवीज निर्मिती प्रकल्पांना संस्थात्मक तसेच वैयक्तिक पातळीवर अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ‘हायड्रोजन इंडिया’ या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमात बायोमासचे सहसचिव दिनेश जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक संजय खताळ यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढाव घेतला. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक सुभाष कुमार व रेणुका शुगर्सचे कार्यकारी संचालक रवी गुप्ता यांनी साखरेसह इतर उत्पादनासंदर्भात असलेल्या संधींची माहिती दिली.

यावेळी व्यासपीठावर नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन, वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, हायड्रोजन असोसिएशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. एस. एस. व्ही. रामकुमार, बायोमासचे सहसचिव दिनेश जगदाळे, दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, पी. आर. पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here