वॉशिंग्टन : गरीबांचे रक्षण करण्यासाठी श्रीमंतांवर अधिक कर लादण्याची गरज आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कार्यकारी संचालक क्रिस्टलिना जार्जीवा यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. यासोबतच त्यांनी पाकिस्तान सरकारला सांगितले की, ज्यांना खरोखरच गरज आहे, अशा लोकांना अनुदानाचा लाभ मिळाला पाहिजे. म्युनिच सुरक्षा परिषदेदरम्यान एका मुलाखतीत आयएमएफ प्रमुखांनी सांगितले की, माझे हृदय पाकिस्तानमधील लोकांसोबत आहे. देशातील एक तृतीयांश लोकसंख्येला महापुरामुळे फटका बसला आहे. आम्ही जे काम करीत आहोत, त्यामुळे पाकिस्तान एक सक्षम देश म्हणून काम करू शकेल अशी अपेक्षा आहे. पाकिस्तान अशा स्थितीत जावू नये, जिथे त्यांना कर्जाचे पुर्नगठण करावे लागेल, असे आम्हाला वाटते.
हिंदी न्यूज१८ने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमएफ प्रमुख क्रिस्टलिना म्हणाल्या, आम्ही दोन बाबींवर लक्ष देत आहोत. यामध्ये पहिले म्हणजे करापासून मिळणारा महसूल. सार्वजनिक अथवा खासगी क्षेत्रात जे लोक चांगले पैसे कमवत आहेत, त्यांच्याकडून अधिक कर मिळू शकेल. दुसरे म्हणजे अनुदान फक्त अशा लोकांना मिळाले पाहिजे की जे यासाठी खरोखर गरजू आहेत. आयएमएफ प्रमुखांनी सांगितले की, श्रीमंतांना अनुदानाचा फायदा मिळू नये. गरीबांना याचा लाभ मिळाला पाहिजे. पाकिस्तानातील गरीब लोकांचे रक्षण केले जावे असे आम्हाला वाटते.