भारतात यंदा साखर उत्पादन अंदाजा मध्ये इस्मा ने केली ११.२६ टक्क्यानी घट

587

नवी दिल्ली : चीनी मंडी

भारतात यंदाच्या (२०१८-१९) साखर हंगामात ३५५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या नव्या अंदाजानुसार यात ११.२६ टक्क्यांनी घसरण होणार आहे. यंदाच्या हंगामात ३१५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता असल्याचे इस्माने म्हटले आहे.

गेल्या तीन-चार महिन्यांत यंदाच्या साखर हंगामात उच्चांकी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी ऊस उत्पादनात घट होत असल्यामुळे यंदा अपेक्षेपेक्षा साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश

२०१७-१८ च्या हंगामाच्या तुलनेत यंदा उत्तर प्रदेशात उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यातही Co0238 लागवण जास्त झाल्यामुळे उत्तर प्रदेशातूनच दहा ते पंधरा लाख टन जादा साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता. पण, सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाल्यामुळे उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागात तर उसामध्ये पाणी साचून राहिले होते. त्यामुळे तीन-चार महिन्यांपूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा ऊस उत्पादन घटणार आहे. त्याचबरोबर उपलब्ध उसाच्या रिकव्हरीवरही परिणाम होणार आहे. इस्माच्या म्हणण्यानुसार यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेशात १३० ते १३५ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, आता तेच उत्पादन १२१ लाख टनांपर्यंत होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १२० लाख ४५ हजार टन साखर उत्पादन झाले होते. त्यामुळे यंदाही त्यात फारशी वाढ होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र

जून २०१८ मध्ये महाराष्ट्रात सॅटलाईट इमेजवरून घेण्यात आलेल्या आकडेवारीत राज्यात गेल्या वर्षी पेक्षा उसाच्या क्षेत्रात २५ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यामुळे इस्माने महाराष्ट्रातून ११० ते ११५ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यात किंचित घसरण होऊन, यंदा १०७ लाख टन साखर उत्पादनाचा सुधारीत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी प्रति हेक्टर १०८ टन उत्पादन झाले होते. त्यात यंदा घट होऊन प्रति हेक्टर ९० टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. खोडवा पद्धतीच्या पिकामुळे ही घसरण होण्याची शक्यता इस्माने व्यक्त केली आहे.

अर्थात, जुलै ते सप्टेंबर दरम्यान मान्सून स्थिती योग्य राहील, असा अंदाज घेऊन गणित मांडण्यात आले होते. परंतु, गेल्या तीन महिन्यांत पावसाने दडी मारली. काही ठिकाणी पावसाला गेल्या तीन वर्षांतील सरासरीही गाठता आली नाही.

त्याचबरोबर अहमदनगर, सोलापूर आणि मराठवाडा तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्याच्या काही भागात उसावर पांढऱ्या अळीचा प्रदुर्भाव झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनीच पिक काढून टाकले आहे तर, काही ठिकाणी पिकच हाताला आलेले नाही. यामुळे महाराष्ट्रात तीन-चार महिन्यांपूर्वी व्यक्त केलेल्या  अंदाजापेक्षा १६ ते १८ टक्क्यांनी ऊस उत्पादन कमी होणार आहे. साखरेची रिकव्हरीही घटण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या हंगामाच्या किंचित खाली घसरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी साखर उत्पादन लक्षणीय रित्या कमी होणार आहे.

गेल्या हंगामात १०७.२३ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा ते ९५ लाख टनापर्यंत मर्यादीत राहणार आहे.

कर्नाटक

कर्नाटकच्या उत्तर भागातही पावसाने ओढ दिल्यामुळे उसावर परिणाम झाला आहे. तसेच त्याभागातही काही ठिकाणी पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे राज्यात उसाचे क्षेत्र २० टक्क्यांनी वाढूनही अपेक्षित ऊस उत्पादनावर परिणाम होणार आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत कर्नाटकमध्ये साखर उत्पादन १२ ते १३ टक्क्यांनीच वाढण्याची शक्यता आहे. राज्यातून ४४.८ लाख टन साखर उत्पादन होईल, असा जुलैमधील अंदाज होता. पण, आता तेथून ४२ लाख टन साखऱ उत्पादन होण्याची शक्यता आहे.

इतर राज्यांमध्ये मात्र उसावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हवामान आणि कमी पावसामुळे उसावर आणि पर्यायाने साखरेच्या उत्पादनावर परिणाम होताना दिसत आहे. यंदा देशाचे एकूण साखर उत्पादन ३२० लाख टन होण्याचा अंदाज आहे. पण, साखर उत्पादन इथेनॉलकडे वळवले, तर आणखी साखर कमी होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीची टेंडर खुली करण्यात आली आहेत. आजवर पहिल्यांदाच ४८.५ कोटी लिटर बी ग्रेड इथेनॉल तर, १.४८ कोटी लिटर थेट उसाच्या रसापासून केलेल्या इथेनॉलसाठी बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे बी ग्रेड मळी आणि थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीमुळे आणखी साखर उत्पादन घटण्याची अपेक्षा आहे. यात चार ते पाच लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे देशातील एकूण उत्पादन ३१५ लाख टनापर्यंत खाली येईल.

सध्या भारतात अनेक ठिकाणी अद्याप गाळप सुरू झालेले नाही. त्यामुळे एकदा गाळप सुरू झाल्यानंतर उसाच्या रिकव्हरीचे आकडे समोर येतील. त्यातून आणखी अचूक अंदाज बांधता येणार आहे. त्यावरून इस्मा २०१९मध्ये आणखी एक अंदाज व्यक्त करणार आहे.

ऑक्टोबर २०१८च्या सुरवातीलाच १०७ लाख टन साखर शिल्लक आहे. देशाची गरज २५५ ते २६० लाख टन आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील शिल्लक ४० ते ५० लाख टन साखर, असा एकूण ११२ ते १२७ लाख टन शिल्लक साठा सप्टेंबर २०१९ला भारताकडे असेल, असे इस्माचे म्हणणे आहे. अर्थातच २०१९-२०चा हंगाम सुरू होताना, पुन्हा मोठ्या प्रमाणावर शिल्लक साखर पहायला मिळणार आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here