नवी दिल्ली : वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, रत्न, आभूषणे, इंजिनीअरिंग तसेच पेट्रोलियम उत्पादनांसह विविध क्षेत्रातील चांगल्या मागणीमुळे भारताची निर्यात वधारली आहे. पहिल्या आठवड्यातच निर्यात ५२.३९ टक्क्यांनी वाढून ७.७१ अब्ज डॉलरवर पोहोचली. १ ते ७ जून या कालावधीत आयतीमध्येही ८३ टक्के वाढ झाली असून ती ९.१ अब्ज डॉलर झाली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, इंजिनीअरिंगची निर्यात ५९.७ टक्क्यांनी वाढून ७४.११ कोटी डॉलर, रत्न, आभूषणांची निर्यात ९६.३८ टक्क्यांनी वाढून २९.७८ कोटी डॉलरवर गेली. पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात ६९.५३ टक्के वाढून ५३.०६ कोटी डॉलर झाली. मात्र, या कालावधीत लोह, धातू, मसाले, तेलबियांची मागणी नकारात्मक राहीली.
जूनच्या पहिल्याच सप्ताहात पेट्रोलियम आणि कच्च्या तेलाची आयात १३५ पटींनी वाढून १.०९ अब्ज डॉलरवर गेली. इलेक्ट्रॉनिक साहित्य, मोती, मौल्यवान धातूच्या आयातीत वाढ झाली. या काळात अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेशशी निर्यात वाढली असून चीन, अमेरिका, संयुक्त अरब अमीरातीमधील आयातीमध्ये गतीने वाढ झाली.