आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये इंधनाचा खप ९.१ टक्क्यांनी घटला

नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षात देशात इंधनाच्या खपात ९.१ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. गेल्या दोन दशकात पहिल्यांदाच असे चित्र पहायला मिळाले आहे. गेल्यावर्षी कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

शुक्रवारी पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोलियम योजना आणि विश्लेषणात्मक अहवाल जारी केला. त्यानुसार, आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशात २१.४१ कोटी टन पेट्रोलियम पदार्थांचा खप झाला होता. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १९ कोटी ४६ लाख टन खप झाला आहे. यापूर्वी वर्ष १९९८-९९ नंतर पहिल्यांदा पेट्रोलीयम पदार्थांची विक्री घसरली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दरम्यान डिझेलची विक्री १२ टक्क्यांनी घटून ७.२७ कोटी टन आणि पेट्रोलची विक्री ६.७ टक्क्यांनी घटून २.७९ कोटी टनावर आली आहे.

विमानाच्या इंधनाच्या खपात ५३.६ टक्क्यांची घसरण झाली. हा खप ३७ लाख टन झाला आहे. नाफ्ता खप १.४२ कोटी टन म्हणजे एक वर्षापूर्वीइतकाच झाला आहे. रस्ते निर्मितीचे काम गतीने झाल्याने कोळसा डांबराची विक्री ६ टक्क्यांनी वाढून ७१.१ लाख टनावर पोहोचली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात घरगुती गॅसच्या विक्रीत वाढ झाली आहे. याची विक्री ४.७ टक्क्यांनी वाढून २.७६ कोटी टनावर पोहोचली. गेल्या आर्थिक वर्षात, २०१९-२० मध्ये ही विक्री २.६३ कोटी टन होती. गरीब कुटुंबांना मोफत सिलिंडर दिल्यामुळे घरगुती गॅसचा खप वाढला आहे.

सरकारने गेल्या वर्षी एप्रिल-मे या कालावधीत देशव्यापी लॉकडाउन लागू केला. लॉकडाउनमुळे कारखाने, व्यवसाय बंद राहिले. व्यापार आणि वाहतूकही थांबली होती. रेल्वेगाड्या, विमानसेवा बंद झाल्या होत्या. जून महिन्यापासून लॉकडाउन हळूहळू शिथिल करण्यात आला.

गेल्या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये ७ ते ८ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र, आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत आर्थिक उलाढाल सुधारल्याचे दिसून आले आहे. मात्र, नव्या वर्षात कोविड १९ ची दुसरी लाट आल्याने काही राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेच्या सुधारणेत अडथळे निर्माण होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here