एफआरपीतील ५ रुपयांची दरवाढ अपुरी: राकेश टिकैत

138

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये केलेली ५ रुपयांची दरवाढ अत्यंत अपुरी आहे. त्यातून शेतकऱ्यांना काहीच फायदा मिळणार नाही असे मत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केले. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना टिकेत यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा करत २५ सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली.

टिकैत म्हणाले, आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष करीत आहोत. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडत आहे. मात्र, सरकारने दखल घेतलेली नाही. सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले पाहिजेत. केंद्र सरकार आमचे म्हणणे ऐकायला तयार नाही. एफआरपी पाच रुपयांनी वाढवून पाच कोटी शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, सध्याची स्थिती, तर खर्च पाहता त्यातून काहीच फायदा मिळत नाही. सरकार आमचे म्हणणे ऐकत नसल्याने आंदोलन तीव्र केले जाणार आहे. पाच सप्टेंबर रोजी मुझफ्फरनगर येथे पंचायतीचे आयोजन केले आहे. सध्या देशातील युवक बेरोजगार झाले आहेत. त्यांना काम हवे. त्यांच्या प्रश्नांकडे कोणीही पाहात नाही.

केंद्र सरकार रेल्वेसह विविध सरकारी मालमत्तेची विक्री करत असल्याचा आरोप टिकैत यांनी केला. ते म्हणाले, देशातील परिस्थिती अतिशय वाईट आहे. सरकार एखादी कंपनी चालवत आहे का असा प्रश्न पडतो. धान्य गोदामात बंद केले आहे. शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरलेले नाही. पंजाब सरकारने दर वाढवले. उत्तर प्रदेश सरकारनेही दरवाढ करण्याची गरज आहे. पाला जाळण्याबाबतचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय चांगला आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळू शकेल असेही टिकैत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. विजेचे दर कमी करायला हवेत. याशिवाय शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावावर पैसे लाटले जात आहेत. शेतकऱ्यांच्या नावे खोटे धान्य खरेदी करून पैसे लाटले गेले आहेत. अशा प्रकरणात कारवाईची मागणी त्यांनी केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here