इथेनॉल निर्मितीतून साखर कारखान्यांचे वाढले उत्पन्न

नवी दिल्ली : देशात ३० नोव्हेंबरअखेर १,३८० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली आहे. त्यापैकी मोलासिस म्हणजे उसाच्या मळीपासून ८७५ कोटी लिटर आणि ५०५ लिटर इथेनॉल निर्मिती धान्यापासून करण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेतील लेखी उत्तरात ही माहिती दिली. इथेनॉलच्या विक्रीद्वारे साखर कारखान्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे. त्यामुळे साखर कारखाने शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत देण्यास सक्षम झाली आहेत.

मंत्री साध्वी निरंजन ज्योती लोकसभेत माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते साध्य करण्यासाठी १,०१६ कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. इतर वापरासाठी मिळून एकूण १,३५० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. ८० टक्के उत्पादनक्षमता गृहीत धरून २०२५ पर्यंत देशात १,७०० कोटी लिटर इथेनॉल निर्मिती क्षमता गरजेची आहे. नवीन इथेनॉल कारखाने, सध्याच्या कारखान्यांचा विस्तार यातून ४०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. साखर कारखान्यांनी गेल्या १० वर्षांत इथेनॉलच्या विक्रीतून ९४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here