नवी दिल्ली : कॅनडातील काही भागांमध्ये भारतविरोधी कारवाया होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने बुधवारी कॅनडातील आपल्या नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. जूनमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याच्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या खोट्या दाव्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. पीएम ट्रुडो यांच्या या खोट्या वक्तव्यावर सर्व बाजूंनी टीका होत आहे.
कॅनडामधील भारतविरोधी वाढत्या कारवाया आणि वाढते हिंसाचार लक्षात घेता तेथे उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना आणि कॅनडा दौर्यावर जाण्याचा विचार करणार्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे कि, कॅनडामध्ये अलीकडे भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणार्या भारतीय समुदायाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे.
तत्पूर्वी, भारताने मंगळवारी कॅनडाच्या राजदूताला बोलावले, त्यानंतर त्यांनी कॅनडाच्या एका वरिष्ठ मुत्सद्याची हकालपट्टी करत त्याला 5 दिवसांत देश सोडण्यास सांगितले. भारताने खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येशी संबंध असल्याचा आरोप कॅनडा सरकारने केला होता. भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.