2025 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचेल : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचेल आणि या दशकाच्या अखेरीपर्यंत अर्थव्यवस्था दुप्पट होऊन 10 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स, असा दावा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केला. सध्या भारतीय अर्थव्यवस्था अंदाजे 3.7 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

मंत्री पुरी मंगळवारी ANI शी बोलताना म्हणाले कि, भगवान राम आपल्याला आशीर्वाद देत आहेत. आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत आणि आपला शेअर बाजार चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. मला वाटते की पुढील 1-2 वर्षांत आपण केवळ जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार नाही तर आपण आणखी पुढे जाऊ .

मंत्री पुरी म्हणाले, मला कुठेतरी सांगण्यात आले होते की 2028 पर्यंत आपण 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होऊ. मी त्यांना सांगितले की 2028 पर्यंत प्रतीक्षा करण्याची गरज नाही, ते उद्दिष्ट 2024-25 पर्यंत पूर्ण होईल. इतकेच नाही तर 2030 पर्यंत आपण 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होऊ. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असो, ऑटोमोबाईल मार्केट असो, ऊर्जा असो किंवा जैवइंधन असो, भारताविषयी जागतिक गुंतवणूकदरांचे स्वारस्य दिवसेंदिवस वाढत असल्याचे मंत्री पुरी यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा 7.3 टक्के वाढ अपेक्षित आहे, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने 5 जानेवारीला सांगितले. 2022-23 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 7.2 टक्के आणि 2021-22 मध्ये 8.7 टक्के वाढली होती. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगला मागे टाकत भारत जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनला आहे. ब्लूमबर्गने संकलित केलेल्या डेटानुसार, भारतीय एक्सचेंजेसवर सूचीबद्ध केलेल्या शेअर्सचे एकत्रित मूल्य सोमवारच्या बंदपर्यंत USD 4.33 ट्रिलियन, तर हाँगकाँगचे USD 4.29 ट्रिलियन इतके होते. शीर्ष तीन शेअर बाजार अमेरिका, चीन आणि जपान आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here