सौदीकडील तेल आयातीत कपात, अमेरिका, कॅनडा, आफ्रिकी देशांतून आयातीचा भारताचा निर्णय

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढीने सरकारची चिंता वाढवली आहे. सरकार आता कोणत्याही परिस्थितीत तेल दरावर नियंत्रण आणू इच्छित आहे. त्यामुळे भारताने ओपेक देशांनी उत्पादन वाढविण्याचा आग्रह धरला होता. सौदी अरेबियाकडे महागड्या तेलाबाबत तक्रारही केली. मात्र, भारताने स्वस्त दरातील तेल खरेदी करून त्याचा साठा करावा असा सल्ला सौदीने दिला होता. आता भारत सौदी अरेबियासह इतर आखाती देशांतील महागड्या तेल खरेदीला आळा घालू इच्छित आहे. त्यामुळे अमेरिका, कॅनडा, पश्चिम आफ्रिकी देश, गयाना, मेक्सिकोमधून तेल आयात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या देशांकडून भारताला तेल आयातीचे दोन फायदे होतील. एकतर भारताला तेल कमी दरात मिळेल आणि ओपेक देशांवरील अवलंबित्व कमी होईल. भारताने मेक्सिकोकडून मोठ्या प्रमाणावर तेल आयात सुरुवात केली आहे. भारत आपल्या गरजेच्या ८६ टक्के तेल ओपेक देशातून आयात करतो. यातील १९ टक्के वाटा सौदीचा आहे. आता भारताने आपले धोरण बदलत सौदीकडून कच्चे तेल मागविणे कमी केले आहे. जानेवारी महि्यात जेवढे तेल सौदी अरेबियाकडून मागविण्यात आले, ते आधीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी आहे.

ओपेक देशांपैकी जगातील काही देशांकडून भारताला स्वस्त तेल मिळू शकेल. गेल्या आठवड्यात भारताने सौदीकडे उत्पादन वाढीची मागणी केली. मात्र, त्यास सौदीची तयारी नाही. यापूर्वी खरेदी केलेल्या स्वस्त तेलाचा वापर करा असा सल्ला सौदी अरेबियाने दिला. उत्पादन न वाढविण्याच्या निर्णयामुळे दराने उसळी घेतली आहे. अशा स्थितीत अमेरिकेतील कच्चे तेल स्वस्त झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. याशिवाय मेक्सिको, गयानामध्येही तेलाच्या किमती कमी आहेत. भारत येथून खरेदी करू शकतो. त्यातून देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराला आळा घालता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here