भारत मंदीतून बाहेर, डिसेंबरच्या तिमाहीत जीडीपीत ०.४ टक्क्यांची वाढ

120

नवी दिल्ली : आर्थिक मंदीचा सामना करीत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक चांगली बातमी आहे. डिसेंबरच्या तिमाहीत भारताच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) ०.४ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. भारतीय अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

सध्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात जीडीपीत ८ टक्क्यांची घसरण होईल असा अंदाज आहे. जीडीपीच्या या आकडेवारीची सर्वांना प्रतीक्षा होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही आकडेवारी जारी केली आहे. एप्रिल ते जानेवारी या काळात वित्तीय तूट १२.३४ लाख कोटी झाली आहे. सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत देशाचा एकूण जीडीपी ३६.२२ लाख कोटी रुपये राहीला. सन २०१९-२० च्या तिसऱ्या तिमाहीत एकूण जीडीपी ३६.०८ लाख कोटी रुपये होता. सुधारित अंदाजानुसार यावर्षी एकूण जीडीपी १३४.०९ लाख कोटी रुपये राहील. सन २०१९-२०मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत ४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

वस्तूतः भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच तांत्रिक रुपाने मंदीचा तडाखा सोसावा लागला. जेव्हा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेत सलग दोन तिमाहीत घसरण होते, तेव्हा तांत्रिकदृष्ट्या अर्थव्यवस्था मंदीत पोहोचल्याचे मानले जाते. कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात जूनमधील पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत २३.९ टक्क्यांची घसरण झाली होती. देशात कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन हे यामागील कारण होते. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. त्यानंतर सप्टेंबर

महिन्याच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपीत ७.५ टक्क्यांची घसरण झाली.
जीडीपीबाबत आयसीआयसीआय सिक्युरिटीजने १७२२ कंपन्यांचा तिमाही आढावा घेऊन विश्लेषण केले होते. त्यामध्ये अर्थव्यवस्थेत गतीने सुधारणा होत असल्याचे आढळले होते. तर काही एजन्सी तसेच संशोधन संस्थांनी तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था सकारात्मक होईल असे अनुमान वर्तवले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबरमध्ये जारी केलेल्या स्टेट ऑफ दी इकॉनॉमी अहवालात अर्थव्यवस्था चांगली स्थितीकडे वाटचाल करीत असल्याचे म्हटले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here