कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी भारत सज्ज: अर्थ मंत्रालयाचा दावा

138

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची पहिली लाट यशस्वीपणे थोपविल्यानंतर भारत आता दुसऱ्या लाटेशी लढण्यास सज्ज झाला असल्याचे अर्थ मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे. भारत आगामी काळात आपली स्थिती अधिक चांगली, मजबूत करेल असे आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ऐतिहासिक महामारीशी यशस्वी लढा दिल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्था सर्वोत्तम आणि मजबूत बनण्यासाठी सज्ज झाली आहे. काही उच्च संकेतांकांमधून हे दिसून येत आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेद्वारे गुंतवणूकीत झालेली वाढ आणि २०२१-२२च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाने याचा मार्ग प्रशस्त केला आहे. अर्थसंकल्पाने पायाभूत सुविधांवर भर दिला आहे.

अहवालात म्हटले आहे की, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत दैनंदिन नव्या रुग्णांत वाढ झाल्याने कोविड १९च्या संक्रमणाची दुसरी लाट सुरू झाली. पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेत १५१ दिवसांचे अंतर आहे. इतर देशांमध्ये या लाटेचे अंतर खूप कमी आहे. अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, २०२०-२१ मधील आव्हाने संपुष्टात येण्याबरोबरच २०२१-२२ मध्ये आपल्याला आत्मनिर्भर आणि प्रगतीशील भारत पहायला मिळेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणांमुळे केंद्र सरकारच्या महसूलात वाढ झाली आहे. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ यांदरम्यान महसूली तूट १४.०५ लाख कोटी रुपये होती. जी २०२०-२१ च्या सुधारीत अनुमानाच्या ७६ टक्के इतकी आहे. चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत आणि महसूल वाढीचा वेग पहायला मिळाला. राज्यांना २०२०-२१ या काळात केंद्र सरकारने ४५००० कोटी रुपये अतिरिक्त दिले आहेत. यामध्ये ८.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारने २०२०-२१ या काळात एकूण १३.७ लाख कोटी रुपये बाजारातून कर्ज घेतले आहे. त्याचा सरासरी दर ५.७९ टक्के आहे. गेल्या १७ वर्षात ही सर्वात कमी रक्कम आहे असे अहवालात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here