भारत कोरोनामुक्तीच्या दिशेने : दोन वर्षात सर्वात कमी रुग्णसंख्या

देशात कोरोना संक्रमितांची संख्या ज्या गतीने घटत आहे, ते पाहता काही दिवसांत देश कोरोनामुक्त होईल अशी शक्यता आहे. याशिवाय मृतांची संख्याही घटली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात १००० पेक्षाही कमी रुग्णसंख्या आढळली आहे. अहवालानुसार ९१३ नवे रुग्ण आढळले असून ही संख्या गेल्या ७१५ दिवसांत सर्वात कमी आहे. या कालावधीत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३१६ जण बरे झाले आहेत. देशात आता केवळ १२५८७ सक्रीय रुग्ण शिल्लक राहिले आहेत. ही संख्याही गेल्या ७१४ दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, दैनिक रुग्ण संक्रमणाचा दर ०.२९ टक्के असून आतापर्यंत एकूण ५,२१,३५८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १,८४,७०,८३,२७९ जणांचे लसीकरण झाले आहे. देशाची राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासात केवळ ८५ रुग्ण आढळले आहेत. एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. संक्रमण दर घटून ०.८६ टक्क्यांवर आला आहे. राजधानीत एकूण रुग्णसंख्या १८,६५,३०० वर पोहोचली आहे. तर कोरोना मृतांची एकूण संख्या २६,१५३ झाली आहे. महाराष्ट्रात ११७ नवे रुग्ण आढळले असून मुंबईत गेल्या चोवीस तासात ३५ नवे रुग्ण आढळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here