इराण- अमेरिका युध्द झाल्यास भारताला बसणार जबर फटका

नवी दिल्ली : अमेरिकेने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तेलाच्या किंमती ४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. सरकार आर्थिक मंदीचा सामना करत असेल आणि सोन्या-चांदीची किंमत वाढली तर चिंता आणखी वाढते. त्यामुळे भारतासह विविध देशांची चिंता आता वाढली आहे. कारण, इराण आणि अमेरिका यांचा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. याचं रुपांतर युद्धात झाल्यास विविध देशांना झळ सोसावी लागणार आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य भारतीयांवरही होईल. इंधनाचे दर वाढल्यास वाहतूक खर्चही वाढतो आणि परिणामी सर्व वस्तू महागतात. महागाई दर नोव्हेंबर महिन्यात ५.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक आहे.

अमेरिकेने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये इराण क्रांतीकारी सैन्याचे टॉप कमांडर कासिम सुलेमानीचा मृत्यू झाला. इराणच्या अत्यंत प्रशिक्षित कुद्स सैन्याचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात होता. याच वेळी अमेरिकेन सैन्याने हवाई हल्ला केला. याच हल्ल्यात इराण समर्थित मोबलायझेशन फोर्सच्या डिप्युटी कमांडरचाही मृत्यू झाला. सुलेमानीला मारण्याचा आदेश थेट डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिला होता, अशी माहिती अमेरिकन सैन्याने दिली. यामुळे आता इराण आणि अमेरिका युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत.

सोन्याचे दरही वाढणार

आखाती देशातील तणावानंतर सोने आणि चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. परदेशी बाजारपेठेतील संकेतांमुळे भारतीय बाजारातही सोन्याने विक्रमी भाववाढ गाठली आहे. भारतीय वायदे बाजार मल्टी कमोडिटी एक्स्चेंज म्हणजे एमसीएक्सवर ३९ हजार ९२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. आर्थिक अनिश्चितता वाढल्यामुळे ग्राहक सोन्यासारखी सुरक्षित गुंतवणूक निवडतात, ज्यामुळे सोन्याचे दर वाढतात.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here