कर्नाल : भारत २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण गाठण्यात यशस्वी होईल असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी व्यक्त केला.
शहा यांनी हरियाणा सहकारी निर्यात केंद्रात (हॅफेड) आयोजित एका कार्यक्रमात हरियाणा सहकारी विभागातील विविध योजनांचे उद्घाटन केल्यानंतर ही घोषणा केली. या योजनांमध्ये १५० कोटी रुपयांच्या इथेनॉल योजनेचा समावेश आहे. त्यापासून प्रती दिन ९,००० लिटर इथेनॉल उत्पादन केले जाईल.
यावेळी सभेत बोलताना शहा म्हणाले की, हरियाणा सरकारकडून सुरू केल्या जात असलेल्या इथेनॉल योजनेमुळे सहकारी साखर कारखान्यांचे उत्पन्न वाढेल. इथेनॉल आमच्या देशातील पेट्रोलिम उत्पादनांची आयात कमी करण्यास मदत करेल. यासोबत जैवइंधन पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपयुक्त आहे. युपीए आघाडीविरोधात टीका करताना शहा म्हणाले की, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रण कमी होते. आज आम्ही १० टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. आणि २०२५ पर्यंत नरेंद्र मोदी सरकार पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी ठरेल. ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) खराब धान्याचाही इथेनॉल उत्पादनासाठी वापर केला जाईल.