नवी दिल्ली : आफ्रिकन देशांमधून घटलेली मागणी आणि विविध व्यापारी अडचणींमुळे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताच्या तांदूळ निर्यातीच्या मूल्यामध्ये 10 टक्क्यांहून अधिक घट नोंदविण्यात आली आहे. निर्यातीचे प्रमाण वाढले असले तरी निर्यातीतून मिळणारे एकूण उत्पन्न कमी झाले आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यात विकास प्राधिकरणाच्या (APEDA) आकडेवारीनुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात भारताने 1.5 कोटी टनांहून अधिक बिगर-बासमती तांदळाची निर्यात केली. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 6.5 टक्के अधिक आहे. मात्र, निर्यातीचे मूल्य 6.53 अब्ज डॉलरवरून 5.86 अब्ज डॉलरपर्यंत घसरले आहे.
आफ्रिकेतील घटलेल्या मागणीचा मोठा परिणाम…
पश्चिम आणि मध्य आफ्रिका तसेच आसियान (ASEAN) देशांमध्ये भारतीय तांदळाच्या निर्यातीमध्ये घट झाली. याउलट दक्षिण आशिया, पूर्व आफ्रिका, पश्चिम आशिया आणि दक्षिण आफ्रिकेतील काही देशांमध्ये निर्यात वाढली.निर्यातदारांच्या मते, भारताच्या निर्यात धोरणातील अनिश्चितता, आफ्रिकन देशांतील परकीय चलनाची टंचाई, थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तानकडून वाढती स्पर्धा, मालवाहतुकीतील अडथळे आणि मोठ्या प्रमाणावरील साठ्यांमुळे खरेदीदारांची कमी झालेली रुची यामुळे भारतीय तांदूळ निर्यातीवर परिणाम झाला.
डॉलरची टंचाई, स्थानिक चलनात व्यापाराची मागणी…
नायजेरिया, सेनेगल आणि बेनिनसारख्या देशांमध्ये अमेरिकन डॉलरची मोठी कमतरता असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. अनेक खरेदीदारांनी स्थानिक चलनात व्यवहार करण्याचा प्रस्ताव दिला, मात्र भारतीय निर्यातदारांनी तो स्वीकारला नाही. त्यामुळे नवीन करारांमध्ये विलंब झाला आणि निर्यात कमी झाली. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (USDA) अंदाजानुसार, जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा सुमारे 40 टक्के राहणार आहे. फिलिपिन्स, व्हिएतनाम आणि चीन हे प्रमुख आयातदार देश राहतील.सप्टेंबर 2026 ते ऑगस्ट 2027 या कालावधीत भारताची बासमती आणि बिगर-बासमती तांदूळ निर्यात 2.45 कोटी टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
किंमतीच्या बाबतीत भारत अजूनही सर्वाधिक स्पर्धात्मक…
जागतिक बाजारपेठेत भारतीय तांदूळ अजूनही सर्वाधिक स्पर्धात्मक मानला जातो. 5 टक्के तुटलेल्या तांदळाची निर्यात किंमत सुमारे 350 डॉलर प्रति टन आहे. ही किंमत पाकिस्तानपेक्षा 40 डॉलर, व्हिएतनामपेक्षा 60 डॉलर आणि थायलंडपेक्षा 145 डॉलर कमी आहे. तसेच उकडलेल्या (Parboiled) तांदळाची भारतीय किंमत 338 डॉलर प्रति टन असून पाकिस्तानमध्ये ती 391 डॉलर आणि थायलंडमध्ये 511 डॉलर प्रति टन आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) मते, मर्यादित व्यापारामुळे भारतातील तांदळाच्या किंमती स्थिर ते किंचित नरम राहिल्या आहेत.
भारताचा बाजारातील हिस्सा झाला कमी…
तज्ज्ञांच्या मते, 2022 नंतर भारताने तांदूळ निर्यातीवर निर्बंध घातल्यानंतर अनेक आफ्रिकन देशांनी इतर पुरवठादारांशी दीर्घकालीन करार केले. त्यामुळे भारताची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आणि खरेदीदारांचा विश्वासही कमी झाला.दुसरीकडे, फिलिपिन्स आणि इंडोनेशियासारख्या देशांनी देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आयात निर्बंध लागू केले, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांसमोर अतिरिक्त आव्हाने निर्माण झाली.थायलंड आणि व्हिएतनामच्या चलनमूल्यातील घसरण तसेच पाकिस्तानच्या आक्रमक किंमत धोरणामुळे आफ्रिकन खरेदीदारांनी स्वस्त पर्यायांकडे वळणे पसंत केले. याशिवाय, इराण युद्धामुळे मालवाहतूक खर्च आणि युद्ध जोखीम अधिभार वाढल्याने भारतीय निर्यातदारांचा खर्च आणखी वाढला आहे.


















