नवी दिल्ली : कोरोना काळातही भारताने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये उच्चांकी ४१८ अब्ज डॉलरच्या मालाची निर्यात केली आहे. या निर्यातीचे उद्दीष्ट गाठताना पेट्रोलियम पदार्थ, इंजिनीअरिंग साहित्य, जेम्स अँड ज्वेलरी, केमिकल, औषधे यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी रविवारी आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील व्यापाराची आकडेवारी जारी करताना सांगितले की, पेट्रोलियम पदार्थ, इंजिनीअरिंगचे साहित्य, जेम्स अँड ज्वेलरी, केमिकल्स या घटकांनी अधिक चांगली कामगिरी केली आहे.
मनीकंट्रोल डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, मार्च २०२२ मध्ये देशाने ४० अब्ज डॉलरची निर्यात केली आहे. ही निर्यात एका महिन्याच्या कालावधीतील सर्वोच्च आहे. मार्च २०२१ मध्ये ३४ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. अधिकृत आकडेवारीनुसार भारताने २०२०-२१ मध्ये २९२ अब्ज डॉलरची निर्यात केली होती. वर्ष २०२१-२२ मध्ये ही निर्यात वाढून ४१८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. २३ मार्च रोजी देशाने ४०० अब्ज डॉलरची निर्यात केली. गोयल म्हणाले की, आर्थिक वर्षात पेट्रोलियम पदार्थ, इंजिनीअरिंग, ज्वेलरी, केमिकल्स, फार्म सेक्टरने चांगली कामगिरी केल्याने निर्यात वाढली आहे. अमेरिकेनंतर यूएई, चीन, बांगलादेश, नेदरलँड यांना निर्यात करण्यात आली आहे. पंतप्रधानांनीही ४०० अब्ज डॉलरच्या निर्यातीचे कौतुक केले आहे.