नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान गव्हाची निर्यात २९.२९ टक्क्यांनी वाढून १.५० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली. गेल्या वर्षी समान कालावधीत १.१७ अब्ज डॉलर निर्यात झाली होती. सरकारने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, काही देशांच्या विनंतीनंतर अन्न सुरक्षेच्या गरजा भागविण्यासाठी निर्यात करण्याची मर्यादित परवानगी दिली आहे. एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत बासमती तांदळाची निर्यातही ३९.२६ टक्क्यांनी वाढून २.८७ अब्ज डॉलर झाली. तर गैर-बासमती तांदळाची निर्यात याच कालावधीत ५ टक्क्यांनी वाढून ४.२ अब्ज डॉलर झाली आहे, असे मंत्रालयाने सांगितले.
न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या ८ महिन्यांत गव्हाची निर्यात २९.२९ टक्क्यांनी वाढून १५०.८ दशलक्ष डॉलर झाली आहे. एप्रिल-नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ही निर्यात ११६.६दशलक्ष डॉलर होती. यंदा कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात १६ टक्क्यांनी वाढून १७.४३ अब्ज डॉलर झाली. मंत्रालयाने सांगितले की, वर्ष २०२२-२३ मध्ये, कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांसाठी २३.५६ अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ८ महिन्यांत डाळींची निर्यात ९०.४९ टक्क्यांनी वाढून ३९.२ दशलक्ष डॉलर झाली आहे.