सांगली जिल्ह्यात उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

सांगली : जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, मिरज तालुक्यातील हजारो हेक्टर ऊस क्षेत्रावर लकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. लांबलेला पाऊस, वातावरणात बदलामुळे मोठ्या प्रमाणात उसावर लोकरी मावा पडला असून याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. किडीला आळा घालण्यासाठी सध्या ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशके फवारणी केली जात आहे. कृष्णाकाठच्या कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, पद्माळे तसेच वारणा नदीकाठच्या समडोळी, कवठेपिराण, दुधगाव आदी गावांत सुमारे पाच हजार एकर ऊस आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकरी मावा उसावर पडला आहे. पांढऱ्या रंगाचे कीटक उसाच्या पानाखाली वाढून हरितद्रव्य शोषण करतात. त्यामुळे ऊस काळा पडून वाळतो.

कडेगाव तालुक्यात स्थिती

कडेगाव तालुक्यात लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे, पावसाअभावी उसाचे पीक वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला असताना ज्या माव्याचे संकट आल्याने ऊस उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत. कडेगाव तालुक्यात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. तालुक्यात उसावर अनेक ठिकाणी लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन सुरू केले आहे.

कडेगाव तालुक्यात १८ हजार हेक्टर उस क्षेत्र आहे. उसाला लोकरी माव्याने विळखा घातल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना या रोगाच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. या संकटाचा परिणाम साखर उद्योगावरही होणार असल्याने साखर कारखान्यांनीही याकडे देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना औषध फवारणीची प्रात्यक्षिके देऊन प्रसंगी औषध पुरवठाही होणे गरजेचे आहे.

मावा खाणारी मित्र कीड विकसित…

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे लोकरी मावा खाणारी ‘मित्र कीड’ विकसित झाली आहे. ही ‘मित्र कीड’ या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी साखर कारखान्याकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. उसाच्या पिकावरील लोकरी माया रोग नियंत्रणासाठी शेतकन्यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र पावसाचे अत्यल्प प्रमाण व ढगाळ वातावरण यामुळे माव्याचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे.

चाबूककाणीने मे महिन्यात शेतकऱ्यांची उडवलेली झोप…

पलूस तालुका परिसरात मी महिन्यात चाबूककाणी रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता. या रोगाचा प्रादुर्भाव लागणीपेक्षा खोडवा पिकावर जास्त होतो. उसाच्या शेंड्यामधून लांब चाबकासारखा पट्टा बाहेर पडतो. या पट्ट्यातील काळी पावडर म्हणजेच या रोगाचे बीज. या बीजाचा बेणे आणि हवेवाटे वेगाने प्रसार होतो. विशेष म्हणजे या रोगाची पाच टक्क्यांपेक्षा जास्त लागण झाल्यास पीक काढून टाकावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. आता त्यात लोकरी माव्याची भर पडली आहे.

उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता…

राज्यात सर्वात जास्त उसाचे उत्पादन पश्चिम महाराष्ट्र होते. यंदा कमी ऊस उत्पादनामुळे हंगाम लवकर आटोपला आहे. आता उसावर लष्करी अळी, तांबेरा, पक्का बोईंग, चाबूककाणी, हुमणी अशा किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्याचा फटका आगामी गाळप हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here