नवी दिल्ली : कोरोनाच्या दुःष्परिणामाने भारतच नव्हे तर जगातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांवर परिणाम झाला आहे. आजारासोबत लोक महागाईशी लढत आहेत. अमेरिकेत महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे. तेथे महागाई गेल्या ४० वर्षांच्या उच्च स्तरावर आहे. तर ब्रिटनही महागाईच्या तडाख्यातून सुटलेला नाही. तेथे महागाईचा गेल्या तीन दशकांतील सर्वोच्च दर आहे.
ऊर्जा, वाहतूक, घर खर्च वाढल्याने ब्रिटनमध्ये महागाई गेल्या तीन वर्षात सर्वाधिक गतीने वाढली आहे. महागाईमुळे ब्रिटनमध्ये अनेक कुटूंबांचे बजेट बिघडले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सांगितले की, ग्राहक मूल्य सूचकांक जानेवारीत ५.५ टक्क्यांवर पोहोचला. डिसेंबरमध्ये तो ५.४ टक्के होता. मार्च १९९२ नंतर हा उच्च स्तर आहे.
दरम्यान भारतातही कोरोना संक्रमण गतीने वाढले. त्याचा परिणाम महागाईवर दिसून आला आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ५.५९ टक्के झाला आहे. तो आधीच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये ४.९१ टक्के होता. दुसरीकडे सीपीआयकडून मोजण्यात आलेला महागाईचा दर एक वर्षाआधी ४.५९ टक्के होता. अमेरिकेलाही मोठा फटका बसला आहे. १९८२ नंतर दरवर्षी महागाईचा दर वाढला आहे. त्यामुळे लोकांची कमाई गतीने संपत आहे. जेवण, गॅस, भाडे, मुलांचे शिक्षण आदी बाबींची पूर्तता करताना लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.