नवी दिल्ली : महागाईचा फटका आता कंपन्यांनाही बसू लागला आहे. त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणाऱ्या एफएमसीजी कंपन्यांनी छोट्या पॅकेटचे वजन घटविण्यास सुरुवात केली आहे. पार्ले आणि ब्रिटानियासारख्या ग्रामीण बाजारावर पकड बसविणाऱ्या कंपन्या छोट्या पॅकेट्सच्या विक्रीवर भर दितात. त्यांच्या एकूण विक्रीमध्ये छोट्या पॅकेटमधील वस्तूंचा हिस्सा ४० ते ५० टक्के आहे. महागलेले खाद्यतेल, गव्हाच्या किमतीचे कारण देत या कंपन्यांवर दोन रुपये ते १० रुपयांपर्यंतच्या पॅकेटचे वजन घटविण्यासाठी दबाव वाढला आहे. गेल्या सहा महिन्यात प्रसिद्ध पार्ले जी बिस्कीटाच्या १० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सर्व पॅकेट्चे वजन सात ते आठ टक्के कमी केले गेले आहे.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थानने दिलेल्या वृत्तानुसार, पार्ले प्रॉडक्ट्सचे वरिष्ठ कॅटेगरी प्रमुख कृष्णराव बुद्धा यांनी सांगितले की, छोट्या पॅकेट्सचे उत्पादन आव्हानात्मक बनले आहे. यातून होणारी कमाई चांगली नाही. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत आम्ही पाकिटांचे वजन घटवू. त्यातूनच आम्ही टिकून राहू शकतो. १० रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या पॅकेटच्या किमतीत आम्ही थेट वाढ करतो. महागाईमुळे फक्त कुटुंबांचा खर्च करण्याची शक्तीच घटत नसून कंपन्यांना फटका बसत आहे. घाऊकसोबत किरकोळ महागाईही गतीने वाढत आहे. वार्षिक आधारावर मार्चच्या तिमाहीत साखरेच्या किमतीत सात टक्के वाढ झाली आहे. तर काजूची किंमत ३५ टक्क्यांनी वाढली आहे. खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्याने कंपन्यांकडे पॅकेट्चे वजन घटविण्यासह दरवाढीशिवाय पर्याय नाही असे बुद्धा म्हणाले. पाच रुपयांचे पॅकेट पुढील दोन-तीन वर्षात दहा रुपयांपर्यंत जाईल असे ते म्हणाले.