नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये ग्राहकोपयोगी वस्तूंच्या दरात गेल्या ३० वर्गातील सर्वात जलद वाढ झाली आहे. ऊर्जा, परिवहन, खाद्यपदार्थ आणि फर्निचरच्या दरात वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडला आहे.
ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक मूल्य सुचकांकावर आधारीत महागाईचा दर डिसेंबरपर्यंत १२ महिन्यांत ५.४ टक्के दराने वाढला. मार्च १९९२ नंतर महागाईचा हा सर्वात उच्च स्तर आहे. त्यावेळी महागाईचा दर ७.१ टक्के राहिला होता. एक महिन्यापूर्वी महागाईचा दर ५.१ टक्के होता.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुढील महिन्यांत महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात लाखो कुटुंबांच्या गॅस, वीज दरात ५० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक वाढ होईल. त्यावेळी ऊर्जा दराच्या मर्यादेत अर्धवार्षिक समायोजन होणार आहे.