कृषी संशोधनाची माहिती क्षेत्रीय भाषेमध्ये शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा- मंत्री नितिन गडकरी यांचे आवाहन

विदर्भात मुबलक प्रमाणात असणारा संत्रा,कापूस यावर संशोधन करणाऱ्या संशोधन संस्था तसेच मातीचे सर्वेक्षण करणारी राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन व्यवस्थापन संस्था यांनी आपल्या संशोधनाची माहिती क्षेत्रीय भाषेमध्ये तसेच चित्रफितीच्या माध्यमातून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक , महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर व्यवस्थापन संस्था- एनबीएसएसएलयुपी च्या 46 व्या स्थापना दिनानिमित्त अमरावती मार्गावरील एनबीएसएसएलयुपी सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय कृषी संशोधन परिषद-आयसीएआरचे महासंचालक हिमांशू पाठक, एनबीएसएलयुपी चे संचालक डॉ.बी.एस. द्विवेदी, आयसीएआरचे उमहासंचालक डॉ.एस.के.चौधरी, कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.सी. डी. मायी प्रामुख्याने उपस्थित होते.

संत्रे, सोयाबीन, कापूस यांच्या लागवडीसाठी योग्य मातीची निवड त्यामध्ये योग्य प्रकारचे बियाणे, कीटकनाशक, पाणी यांचा वापर करून योग्य तंत्रज्ञानाद्वारे संशोधनाचा उपयोग समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी विविध संशोधन संस्थामध्ये समन्वय, संवाद आणि सहकार्य आवश्यक आहे असे गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

भारताला कृषी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेत आत्मनिर्भर करण्यासाठी एनबीएसएलयुपी सारख्या संस्थांचे संशोधन महत्त्वाचे आहे. आपल्याला कृषीचा विकास दर हा 22 टक्क्यावर आणायचा आहे यासाठी सुद्धा हे संशोधन कामात येईल असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. कृषी संशोधनामध्ये केंद्र शासनाच्या कार्यरत असणाऱ्या संस्थांनी परस्पर संवाद तसेच सहकार्याच्या माध्यमातून सर्व हितधारकांना सोबत घेणे आवश्यक आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन संस्थेने नागपूर शहर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील नर्सरी सोबत जॉइंट व्हेंचर करून संत्र्याच्या कलमांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना माफक दरात कलम उपलब्ध होऊन संत्रा पिकाची उत्पादकता वाढेल, असे त्यांनी यावेळी सुचविले. आज आपल्या देशामध्ये ऊस, सोयाबीन, कापूस या क्षेत्रांमध्ये दर एकरी उत्पादन हे इतर देशांच्या तुलनेत कमी आहे याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले.

याप्रसंगी वैज्ञानिकांचा सत्कार देखील गडकरींच्या हस्ते करण्यात आला. एनबीएसएलयुपी चे संचालक डॉ.बी.एस. द्विवेदी यांनी संस्थेच्या कामाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. या कार्यक्रमास एनबीएसएलयुपी, आयसीएआर, सीआयसीआर संस्थेचे अधिकारी, वैज्ञानिक, कर्मचारी तसेच निवृत्त वैज्ञानिकही उपस्थित होते.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here