नवी दिल्ली : सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा २७ मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. बजेट अधिवेशनांतर्गत एक महिन्याच्या विश्रांतीनंतर वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, मंत्री सिंधीया यांनी ही घोषणा केली. सिंधीया म्हणाले, सर्व नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे २७ मार्चपासून १०० टक्के प्रवासी क्षमतेने सुरू होतील. कारण भारतामध्ये आता कोरोना व्हायरसच्या स्थितीत सुधारणा झाली आहे.
सरकारने २३ मार्च २०२० पासून आधी एक आठवड्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध लादले होते. कोरोना महामारीदरम्यान हे निर्बंध जवळपास दोन वर्षे वाढविण्यात आले. एअर बबलनुसार जुलै २०२० पासून भारत आणि इतर ३५ देशांत खास उड्डाणे सुरू करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाने आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून विमान प्रवासही स्वस्त होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने हा प्रवासही महागला आहे.