साखर उत्पादक फर्म्सकडे गुंतवणूकदारांचा ओढा

नवी दिल्ली: साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी तेजी दिसून आली. बजाज हिंदुस्थान, द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज, धामपूर शुगर मिल्स, अवध शुगर अँड एनर्जी, उत्तम शुगर मिल्स आणि डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १५ ते २० टक्क्यांची तेजी दिसून आली.

याशिवाय त्रिवेणी इंजिनीअरिंग अंड इंडस्ट्रीज, ईआयडी पॅरी, श्री रेणुका शुगर्स आणि बलरामपुर शुगर मिल्सच्या शेअर्समध्ये १० ते १२ टक्क्यांची तेजी दिसली. तुलनात्मकरित्या सेन्सेक्स ६३.८४ अंक अथवा ०.१३ टक्के घटून ४८,७१८.५२ वर बंद झाला.

अनेक ब्रोकर्सनी भारतातील साखर उद्योगाबाबत सकारात्मक चिन्हे दर्शविली आहेत. जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत स्तरावर फायदेशीर स्थिती आहे. ब्राझिल, थायलंड आणि युरोपिय संघातील देशांतील कमी उत्पादनामुळे मागणी वाढणार आहे आणि निर्यातीला चालना मिळेल. देशांतर्गत स्तरावर सुलभ धोरण, इथेनॉलची वाढती मागणी आणि वाढ याचा फायदा साखर उद्योगाला होईल.

गेल्या महिन्यात देशांतर्गत दरात ७ ते ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. उन्हाळ्याचा कालावधी आणि गाळप हंगाम संपल्याने साखरेच्या किमतीत वाढ झाली आहे. जादा निर्यात आणि इथेनॉल उत्पादनासाठी उसाच्या वापरामुळे साखरेच्या किमती ३४ रुपयांवर राहतील असा अंदाज आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी व्यक्त केला.

जागतिक स्तरावरही किमती वधारल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत कच्ची आणि पांढऱ्या श्रेणीतील साखरेच्या किमती भारतीय साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त आहेत. आगामी सहा महिन्यांत या किमती २० सेंट प्रति पाउंड पार करतील असे ब्रोकरेज फर्म्सचे म्हणणे आहे. त्यामुळे पुढील हंगामातही निर्यातीत सातत्य राहील.

ब्राझिलमध्ये हंगाम सुरू झाला आहे. मात्र, कमी लागवड आणि प्रतिकून मॉन्सूनमुळे उत्पादन कमी होण्याचे अनुमान आहे. उसाचे उत्पादन घटण्यासह त्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ब्राझिलमधील साखर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे असे इलारा कॅपिटलने म्हटले आहे. इतर मुख्य ऊस उत्पादक देशांपैकी थायलंड, युरोपिय संघांद्वारे जास्त उत्पादन होण्याची शक्यता नाही. जागतिक स्तरावरील मागणी अधिक राहील. ब्राझिलमध्ये किमान १० टक्क्यांची घट होऊन ३.४-३.५ कोटी टन उत्पादन राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर मजबूत होत आहेत. ते १६.५ सेंट प्रति पाउंडवर पोहोचले आहेत. भारतात १.०५ कोटी टन साखर अतिरिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here