ISMA कडून हंगाम २०२३-२४ साठी साखर उत्पादनाचे सुरुवातीचे अनुमान जारी

नवी दिल्ली : जून २०२३ च्या उत्तरार्धात उपग्रहाकडून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारावर साखर हंगाम २०२३-२४ मध्ये देशातील ऊस लागवडीचे एकूण क्षेत्र ५९.८१ लाख हेक्टर असण्याचे अनुमान आहे, असे इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने म्हटले आहे. उसाचे हे क्षेत्रफळ २०२२-२३ या साखर हंगामाच्या तुलनेत समान स्तरावर आहे.

एक ऑगस्ट २०२३ रोजी ISMA च्या बैठकीतही यावर चर्चा झाली. यावेळी देशातील साखर उत्पादक राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत ऊस क्षेत्राची छायाचित्रे, अपेक्षित उत्पादन, साखर उतारा, गेल्या आणि चालू वर्षातील पाऊस, धरणांतील पाणीसाठा, एसडब्ल्यू मान्सून २०२३ यादरम्यान अपेक्षित पाऊस यांसह इतर संबंधीत पैलूंवर विस्ताराने चर्चा झाली. त्यानंतर २०२३-२४ या हंगामासाठीचे प्रारंभिक अनुमान जारी करण्यात आले आहे.

हंगाम २०२३-२४ मध्ये एकूण साखर उत्पादन जवळपास ३६२ लाख टन होईल अशी शक्यता आहे. २०२२-२३ मध्ये अनुमानीत उत्पादन ३६९ लाख टन आहे. पुढील हंगामात जवळपास ४५ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वापरली जाईल. तर यावर्षी ४१ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी लागेल असे अनुमान आहे.

जवळपास ४५ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवल्यानंतर ISMA च्या अनुमानानुसार, २०२३-२४ या हंगामात ३१७ लाख टन साखर उत्पादन होईल. तर साखरेचा खप २७५ लाख टन असेल. त्यातून ४२ लाख टन साखर अतिरिक्त राहील. उर्वरीत कालावधीच्या काळातील पाऊस व इतर अनुकूल स्थिती लक्षात घेऊन हे अनुमान वर्तविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here