साखरेची एमएसपी वाढविण्यासाठी इस्माचे पंतप्रधान कार्यालयाला पत्र

उसाच्या योग्य आणि किफातयशीर दरात (एफआरपी) वाढ झाल्यानंतरची साखरेचा किमान विक्री दर ३० महिन्यांहून अधिक काळापासून स्थिर आहे. अलिकडेच सरकारने एफआरपीमध्ये पुन्हा एकदा ५ रुपये प्रती क्विंटल वाढ केली आहे. त्यामुळे उद्योग जगतातील प्रमुख संस्था इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) एमएसपीमध्ये वाढ करुन ती ३४.५० ते ३५ रुपये करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. सध्या एमएसपी ३१ रुपये असून दरवाढीची हीच योग्य वेळ असल्याचे इस्माचे म्हणणे आहे.

इस्माने पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात साखर उद्योगातील विविध घटकांवर प्रकाश टाकला आहे. यामध्ये इनपूट, कच्चा माल, वेतन, मजूरांचा पगार, देखभालीसाठीचा खर्च आदींमध्ये १० ते १५ टक्के वाढीमुळे साखरेची एमएसपी तत्काळ वाढीची गरज असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या वाढत्या खर्चामुळे साखर कारखान्यांना उसाचे पैसे देण्यात अडचणी येत असल्याचे इस्माचे म्हणणे आहे.

पत्रात म्हटले आहे की, साखर कारखाने, कंपन्यांच्या एकूण महसुलाच्या ८० टक्के पैसे फक्त साखरेतूनच उभे राहतात. वीज, इथेनॉल अशा उपपदार्थांचे महसुलातील योगदान १५-२०टक्क्यांपर्यंत आहे. जर साखर कारखान्यांच्या एमएसपीमध्ये ३-४ रुपयांची वाढ झाली तर कारखान्यांना बँकांकडून खेळते भांडवल घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्जावेळी साखरेच्या मूल्यांकनात वाढ होईल. एमएसपी वाढल्याने कारखानदारांना १०००० ते १२००० कोटी रुपयांचे अतिरिक्त खेळते भांडवल उभे राहू शकते. त्यातून पुढील हंगामात शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेवर देणे शक्य होईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here