किसन वीर साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी जितेंद्र रणवरे

सातारा : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील जितेंद्र रणवरे यांनी पदभार स्वीकारला. रणवरे यांना खासगी व सहकारी क्षेत्रातील २७ वर्षांचा अनुभव आहे. तसेच त्यांना सहकारातील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

रणवरे यांनी आपल्या नोकरीची सुरूवात अकलुज येथील सहकारी महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यातून क्लार्क या पदावरून केलेली होती. त्यानंतर एक्साईज ऑफिसर, लिगल अॅण्ड मार्केटींग ऑफिसर तर २०११ मध्ये त्यांनी सोलापूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सेक्रेटरी पदापर्यंत मजल मारलेली होती. त्यानंतर त्यांची विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे गंगामाई युनिटवर त्यांना असिस्टंट जनरल मॅनेजर या पदावर नियुक्ती झाली.

२०१५ मध्ये साखर आयुक्तांच्या मार्फत घेण्यात आलेल्या कार्यकारी संचालक पदाच्या परिक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले. जुलै २०१६ मध्ये लातुर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर ते कार्यकारी संचालक म्हणून रूजु झालेले होते. याकाळात कारखान्याला विविध पुरस्कार मिळवुन देण्यात त्यांचे महत्वाचे योगदानहोते.

किसन वीर कारखान्याची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील व व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ करीत आहे. कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांचा सत्कार कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी उपाध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी केला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here