जेएनपीएने समुद्रातील पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी अव्याहतपणे कार्यरत केंद्राचे केले उद्‌घाटन

जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण या भारतातील उत्तम कामगिरी करणाऱ्या बंदराने, आयआयटी मद्रास संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या सहकार्याने समुद्रातील पाण्याच्या गुणवत्तेचे अव्याहतपणे परीक्षण करणारे केंद्र सुरु केले आहे. पर्यावरणावर लक्ष ठेवता यावे यासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनाचीही सुरुवात केली आहे. जवाहरलाल नेहरू बंदरात 21 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या कार्यक्रमात जेएनपीएचे अध्यक्ष तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी संजय सेठी यांच्या हस्ते या उपक्रमांचे उद्घाटन झाले. जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ तसेच जेएनपीए मधील विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना, संजय सेठी म्हणाले, “शाश्वततेच्या बाबतीत आघाडी घेण्यासाठी आणि आर्थिक, सामाजिक तसेच पर्यावरणीय मापदंडाच्या कसोटीवर दिसून येणारी व्यवसायासाठीची मूल्ये निर्माण करण्यासाठी जेएनपीए कटिबद्ध आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून जबाबदार बंदर म्हणून स्थान निर्माण करण्याचे प्रयत्न जेएनपीए करत असते. समुद्रातील पाण्याच्या गुणवत्तेचे अव्याहतपणे परीक्षण करणारे केंद्र आणि पर्यावरणावर लक्ष ठेवता यावे ई- वाहनाची सुरुवात म्हणजे शाश्वत विकासाप्रती असलेल्या वचनबद्धतेच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.”

पाण्याच्या गुणवत्तेची अव्याहत तपासणी करणारी यंत्रणा तसेच ई-परीक्षण वाहनामुळे बंदर परिसरातील सागरी जल तसेच हवेचा दर्जा यांचे व्यवस्थापन करण्यात मदत होईल आणि बंदर परिसरात पर्यावरणाच्या गुणवत्तेचे नियमन होईल. या उपक्रमांतून, जेएनपीए, वाहनांची हरितगृह वायू पदचिन्हे कमी करु शकेल. त्याचप्रमाणे तापमान, पीएच, विद्राव्य ऑक्सिजन, अमोनिया, वाहकता, नायट्रेट, क्षारता, गढूळपणा तसेच समुद्राच्या पाण्याचा टीडीएस यांच्यावर आधारित पाण्याच्या गुणवत्तेविषयीची माहिती बंदर मालमत्ता परिसरातील पर्यावरणाची गुणवत्ता नियमानुसार आहे किंवा कसे हेही तपासता येईल. सागरी वातावरणात स्वच्छताविषयक प्रमाणके राखण्यासाठी समुद्राच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आधरित माहिती मिळवणे अत्यावश्यक आहे. सभोवतालची हवा आणि आवाज यांच्या परीक्षणासाठी जेएनपीए येथे सुरु असलेल्या उपक्रमांना देखील ई-वाहनाची मदत होणार आहे.

जेएनपीए ने बंदर परिसरात, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, परिसरातील हवेची गुणवत्ता तपासणारे अहोरात्र कार्यरत केंद्र, व्यापक घन कचरा व्यवस्थापन सुविधा, बंदर परिसर तसेच टाऊनशिप मधील दिव्यांच्या जागी एलईडी दिवे बसविणे, ए-आरटीजीसीएस, किनारपट्टी परिसरातील वीज पुरवठा, शेवा मंदिर आणि शेवा टेकडीच्या पायथा परिसरातील पाण्याच्या साठ्यांचे पुनरुज्जीवन, केंद्रीकृत पार्किंग प्लाझाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीतपणे सुरु राहण्यासाठीचे उपक्रम, खारफुटी व्यवस्थापन तसेच तेल गळतीवर उपाययोजना करून बंदराच्या ठिकाणी हरित आच्छादने निर्माण करणे इत्यादी पर्यावरण सुधारणाविषयक तसेच हरित बंदरविषयक उपक्रमांची सुरुवात केली आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने बंदर परिसरात सुमारे 4.10 एम डब्ल्यू पी क्षमतेची सौर पॅनेल बसविली असून, बंदरातील विजेच्या एकूण मागणीपैकी 38% वीज नवीकरणीय उर्जा स्त्रोतांकडून मिळविली जाते. तसेच विजेचा वापर कमी करून कार्बन पदचिन्हांचे प्रमाण कमी करण्यासाठी या भागात सर्वत्र एलईडी प्रकारच्या दिव्यांचा वापर सुरु करण्यात आला आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here