के. पी. स्वार्थी, बिद्री साखर कारखान्यात परिवर्तन अटळ : मंत्री चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : के. पी. पाटील हे कारखान्याचा कारभार चांगला करतील, असे आम्हाला वाटले. त्यामुळे मागच्या निवडणुकीवेळी आम्ही त्यांना पाठिंबा दिला, पण ती चूक झाली. आता ही चूक दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. के. पी. हा माणूस स्वार्थासाठी गोड बोलतो, अशी टीका मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. मुदाळ (ता. भुदरगड) येथे राजर्षी शाह परिवर्तन विकास आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते. सभासदांनी कारखाना के.पीं.चा नव्हे, तर आपला आहे हे ३ डिसेंबरला दाखवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री चंद्रकांतदादा म्हणाले की, या कारखान्याची उलाढाल साडेचारशे कोटी आहे. एक वर्षी नफा ३ लाख रुपये आहे. तर दुसऱ्या वर्षीचा नफा २ लाख १४ हजार रुपये आहे. एखाद्या गावातील दूध डेअरीलाही ५-१० लाखांचा नफा होतो. त्यामुळे असा कारभार रोखण्याची गरज आहे. मी बिद्री कारखान्याच्या सभासदांच्या व कारखान्याच्या हितासाठी तीन दिवस येथेच ठाण मांडून बसणार आहे. के. पी. यांनी गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून ए. वाय. पाटील यांना फसवले, असा आरोपही मंत्री पाटील यांनी केला.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी के. पी. पाटील यांनी सभासदांच्या हितासाठी कोणत्या कल्याणकारी योजना राबवल्या हे सांगावे, असे आव्हान दिले. आम्ही कारखान्याच्या लेखापरीक्षणाची मागणी केल्यानंतर ते लेखापरीक्षण थांबावे यासाठी त्यांनी धडपड केली. यातून समजते की, कारखान्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप त्यांनी केला. खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भाजपा नेते प्रवीणसिंह सावंत, सूर्याजीराव देसाई, धैर्यशील भोसले, आलकेश कांदळकर, तात्यासो पाटील, जयवंत पाटील, पंडित पाटील, राजेंद्र पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here